बातम्या
Saga of Freedom
By nisha patil - 8/15/2023 7:02:28 AM
Share This News:
आज, १५ ऑगस्ट आपल्या भारत देशाचा ७७ स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्या अगोदर सुमारे दीडशे वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते आणि एखाद्या शेताला जशी कीड लागते तशी व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेऊन, कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला.पारतंत्र्यात किती दिवस जगायचे? आणि आपल्याच देशात परकीयांचे गुलाम म्हणून किती अत्याचार सहन करायचा? स्वतःच्याच देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे? सोन्याचा धूर निघत असलेल्या देशाला असे उघड्या डोळ्यांनी लुटताना किती दिवस बघायचे? असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच ! इंग्रज नराधमांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढण्यासाठी भारत भूमीचे अंकुर उगवले. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आपल्या देशात आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारत मातेच्या क्रांतिकारक पुत्रांनी घेतला.नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवले. इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला. अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत-हसत फासावर गेले.
महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली. सगळ्या बाजूंनी इंग्रजांना घेरून गेले. अखेर तो सुवर्णदिन आला. इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यात भारतीय यशस्वी झाले. दीडशे वर्षे या भारत भूमीवर फडकणारा ‘युनियन जॅक’ खाली घेऊन आपला ‘तिरंगा’ अभिमानाने फडकवण्यात आला.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि अखेर इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ होय. म्हणूनच, हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे.
रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा…
उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा…
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा…
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा…
जय हिंद! जय भारत! वंदे मातरम!!
‘स्वातंत्र्याची गाथा’
|