बातम्या

त्र्यंबोली मंदिर सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपयांचा निधी मंजूर, मंदिर सुशोभिकरणाच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ

1 Crore Fund Sanctioned for Trimboli Temple Beautification


By nisha patil - 9/22/2024 8:26:51 PM
Share This News:



कोल्हापूरचं जागृत देवस्थान असलेल्या त्र्यंबोली देवीचे मंदिर आणि परिसर सुशोभित व्हावा. भाविकांना विविध सेवासुविधा मिळण्याबरोबरच पर्यटनदृष्टया हे स्थळ विकसित व्हावे, या हेतूने प्रादेशिक पर्यटन विभागाकडून त्र्यंबोली मंदिर सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र मंदिर परिसराच्या संपूर्ण सुशोभिकरणासाठी एकूण १० कोटी रूपयांचा आराखडा बनवला असून, तो मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. त्र्यंबोली देवी मंदिर परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामाचा आज शुभारंभ झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते.
 

माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोल्हापूरच्या ऐतिहासिक त्र्यंबोली देवीच्या मंदिर परिसराच्या सुशोभिकरणासाठी प्रादेशिक पर्यटन विभागाकडून १ कोटी रूपयांचा निधी मंजूर झालाय. या निधीतून मंदिर सुशोभिकरणाच्या कामाला आज सुरूवात झाली. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ झाला. या देवस्थानच्या सुशोभिकरणासाठी क वर्ग दर्जा मिळणे गरजेचे होते. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव करून, आपण त्र्यंबोली मंदिराला क वर्ग दर्जा मिळवून दिलाय.

त्यामुळे इथून पुढे दरवर्षी या मंदिराच्या सुशोभिकरणासाठी  विकास निधी मिळणार असल्याची माहिती सत्यजित कदम यांनी दिली. दरम्यान त्र्यंबोली देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविक आणि पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एकूण १० कोटी रूपयांचा आराखडा बनवला आहे. हा आराखडा मंजूर करण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. तर दक्षिण विधानसभा मतदार संघातील अनेक तीर्थस्थळं आणि देवस्थान सुशोभित करण्याचे आपले ध्येय आहे. त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरू असल्याचे माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितले. महापालिकेचे माजी सभापती विजय सुर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. या निधीतून मंदिर परिसरातील वरच्या बाजूचे कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रविंद्र मुतगी, माजी नगरसेवक आशिष ढवळे,  प्रकाश काटे, माजी महापौर दिपक जाधव, वैभव माने, राजसिंह शेळके, सीमा कदम उपस्थित होत्या.


त्र्यंबोली मंदिर सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपयांचा निधी मंजूर, मंदिर सुशोभिकरणाच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ