बातम्या

ग्राहकाभिमुख सेवा देऊन थकीत वीज देयकाची १०० टक्के वसुली करावी

100 recovery of overdue electricity bill should be done by providing customer oriented service


By nisha patil - 10/10/2024 7:52:04 PM
Share This News:



‘महावितरणकडून विविध योजना सध्या राबण्यात येत असून या योजनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवून त्यांना या योजनांत सहभागी करून घ्यावे. वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासह महावितरणच्या विविध सेवा ग्राहकांना कृती मानकानुसार द्याव्यात. दरमहाच्या चालू वीज बिलाची व मागील थकबाकी वसुली करावी. त्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा बनवावा, असे निर्देश महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी दिले. आज गुरुवार (दि.१०) कोल्हापूर येथील ‘ऊर्जा शक्ती’ सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी बोलताना खंदारे म्हणाले, ‘आर्थिक वर्षात कोल्हापूर परिमंडलाची लघुदाब वर्गवारीतील, घरगुती, वाणिज्य, औद्योगिक व इतर ग्राहकांचे मार्च अखेर २५ कोटी असलेली थकबाकी रक्कम ८४.८४ कोटी वर पोहोचली  आहे. थकबाकीसह चालू बिले १००% वसूल करणे हे उद्दिष्ट ठेवावे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी जनमित्रांपासून वरिष्ठ अभियंत्यापर्यंत प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. सध्या कायमस्वरूपी खंडीत करण्यात आलेल्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी अभय योजना सुरु आहे. मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे. संपूर्ण व्याज व विलंब आकार माफ होणार आहे.  सोबतच मागणीनुसार नवीन वीजजोडणी घेण्याची सोय उपलब्ध आहे.  ही योजना दि. ३० नोव्हेंबरपर्यंत असल्याने ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही खंदारे यांनी केले. 

प्रधानमंत्री सुर्यघर योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी अनेक लोकाभिमुख योजना महावितरणच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०  मुळे शेतीला दिवसा वीज देणे शक्य होणार आहे. या सर्व योजनांच्या कामांना गती द्या. तसेच वीजनियामक आयोगाने घालून दिलेल्या कृती मानकानुसार वीज कनेक्शन वेळेत देण्याचे व तक्रार निवारण करण्याच्या सूचना ही प्रादेशिक संचालकांनी यावेळी केल्या. या बैठकीला कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांचे प्रमुख उपस्थितीसह अधीक्षक अभियंते गणपत लटपटे (कोल्हापूर), धर्मराज पेठकर (सांगली), पुनम रोकडे (पायाभूत आराखडा), सहा. महाव्यवस्थापक (विवले) विजय गुळदगड, सहा. महाव्यवस्थापक (मासं) शशिकांत पाटील, उपमुख्य औद्योगिकसंबंध अधिकारी शिरीष काटकर व कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातील सर्व विभागाचे कार्यकारी अभियंते उपस्थित होते. 

‘ऊर्जा शक्ती’ सभागृहाच्या नाम फलकाचे अनावरण

    बैठकी पूर्वी ‘ऊर्जा शक्ती’ सभागृहाच्या नाम फलकाचे अनावरण प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांच्या हस्ते करण्यात आले. या सभागृहात महावितरण कर्मचाऱ्यांनी काढलेले पेंटिंग लावण्यात आले आहेत. कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांचे प्रमुख उपस्थितीसह अधीक्षक अभियंते गणपत लटपटे (कोल्हापूर), धर्मराज पेठकर (सांगली), पुनम रोकडे (पायाभूत आराखडा), कार्यकारी अभियंता (स्थापत्य) प्रवीण पंचमुख व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 


ग्राहकाभिमुख सेवा देऊन थकीत वीज देयकाची १०० टक्के वसुली करावी