बातम्या

एका वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआरसाठी दिलेल्या 1200 कोटींच्या निधीमधून गोरगरिब रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली – पालकमंत्री हसन मुश्रीफ

1200 Crore funds given for Government Medical College and CPR in one year got an opportunity to serve poor patients


By nisha patil - 7/22/2024 10:52:37 PM
Share This News:



एका वर्षात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर)साठी 1200 कोटींच्या  निधीमधून गोरगरिब रुग्णांची सेवा करण्याची संधी माझ्या जन्मभूमीत मिळाली असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर येथील 7 मॉड्युलर ऑपरेशन थेटर्स, अत्याधुनिक मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग आणि रक्ताच्या एचआयव्ही, कावीळ, टाईप बी आणि टाईप सी या अत्याधुनिक, तंतोतंत व जलद टेस्टसाठी आवश्यक असणाऱ्या नॅट मशीनचे लोकार्पण तथा उद्घाटन संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमासाठी कृष्णराज महाडिक, अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शिशिर  मीरगुंडे उपस्थित होते. मागील काही वर्षात बऱ्याच प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालयाची दुरावस्था झाल्याचे आपण पाहिले आहे. आता शेंडा पार्क येथे सुसज्ज असे 1100 खाटांचे रुग्णालय होत आहे. या नवीन इमारतीचे बांधकाम होण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील. तोपर्यंत येथील महाविद्यालयाची इमारत व सीपीआर हॉस्पिटलची आवश्यक दुरुस्ती करून चांगल्या प्रकारे ती इमारत तयार करून भविष्यात ती जिल्हा रुग्णालय वापरणार आहे. शेंडा पार्क येथील महाविद्यालयाच्या आवारात 10 हजार लोकसंख्येची वैद्यकीय नगरीच उभी राहील असे त्यांनी मत व्यक्त केले. 

 

शेंडा पार्क येथील 1100 खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांना निमंत्रण देण्यात आले असून ते ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर येथे येणार असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. 1100 खाटांच्या रुग्णालयामध्ये 600 खाटा सामान्य रुग्णांसाठी असतील, 250 खाटा कॅन्सर रुग्णांसाठी तर 250 या सुपर स्पेशलिटीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या मुला मुलींचे  वसतिगृह, ऑडिटोरियम हॉल, मॉर्चुरी कक्ष इत्यादी कामांचे भूमिपूजनही गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे असे ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाअगोदर त्यांनी शेंडा पार्क येथील जागेची पाहणी करून सभेच्या ठिकाणी भेट दिली व अमित शहा यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सूचना बांधकाम विभागाला दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वेगवेगळ्या कामांचे लोकार्पण झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या कामाचे कंत्राटदार, अधिष्ठाता व संबंधित डॉक्टर यांना धन्यवाद दिले. यावेळी पालकमंत्री म्हणाले, शेंडा पार्क येथील नवीन इमारतीचे काम होईपर्यंत येथील हेरिटेज इमारतीचे संवर्धन करणे तसेच या ठिकाणी येत असलेल्या रुग्णांना सेवा देणे हे काम सर्वांना मिळून करावे लागेल. येथील नूतनीकरणासाठी व दुरुस्तीसाठी 46 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामधून रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था, येथील ड्रेनेज लाईनची व्यवस्था तसेच स्वच्छता केली जाईल.

 

एका वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआरसाठी 1200 कोटीं निधी

वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एका वर्षात दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यासाठी व नवीन आवश्यक इमारतींचे बांधकाम करण्यासाठी जवळपास बाराशे ते तेराशे कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगितले.  यामध्ये राज्य योजनेअंतर्गत संस्थेचे अद्यावतीकरण व यंत्रसामग्री करता 267 कोटी, राज्य योजनेअंतर्गत बांधकामा करिता एकूण 799 कोटी, जिल्हा नियोजन समिती मधून 22.86 कोटी रुपये निधी,  कागल येथील 100 खाटांचे रुग्णालय, उत्तुर आजरा येथील 50 खाटांचे रुग्णालय, सांगाव कागल येथे 100 खाटांचे आरोग्य पथक  यासह यंत्रसामुग्री साठी 237.14 कोटी देण्यात आले आहेत.

 


एका वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआरसाठी दिलेल्या 1200 कोटींच्या निधीमधून गोरगरिब रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली – पालकमंत्री हसन मुश्रीफ