बातम्या

नवीन सेवा जोडणी योजनेतून कोल्हापूर, सांगलीत सहा महिन्यात 19 हजार 553 वीजजोडण्या

19 thousand 553 electricity connections in Kolhapur


By nisha patil - 4/7/2024 8:00:31 PM
Share This News:



 महावितरणने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात चालू वर्षात जानेवारी ते जून 2024 या सहा महिन्याच्या कालावधीत नवीन सेवा जोडणी योजनेतून (एनएससी) 19 हजार 553 वीजजोडण्या दिलेल्या आहेत. त्यात महावितरणच्या खर्चाने आवश्यक पायाभूत विद्युत सुविधांची उभारणी करून 2692 व पायाभूत सुविधांची आवश्यकता नसलेल्या 16 हजार 861 वीजजोडण्या दिलेल्या आहेत.

   नवीन सेवा जोडणी योजनेतून (एनएससी) अकृषक वर्गवारीतील ग्राहकांना नवीन वीजजोडणीसाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्याची आवश्यकता असल्यास ती महावितरणकडून करण्यात येईल. त्यासाठी ग्राहकास कोणताही खर्च करावा लागणार नाही. नवीन ग्राहकांना केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल. याकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्धारीत केलेल्या कृती मानकांनुसार कालमर्यादेचे पालन केले जाईल, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

                 कोल्हापूर जिल्ह्यात नवीन सेवा जोडणी योजनेतून 11 हजार 47 वीजजोडण्या दिलेल्या आहेत. त्यात पायाभूत सुविधांची आवश्यकता नसलेल्या घरगुती वर्गवारीत 7825, व्यवसायिक 2030, औद्योगिक 263 अशा एकूण 10 हजार 118 वीजजोडण्यांचा समावेश आहे. तर महावितरणच्या खर्चाने आवश्यक पायाभूत विद्युत सुविधांची उभारणी करून घरगुती वर्गवारीत 792, व्यवसायिक 78, औद्योगिक 59 अशा एकूण 929 वीजजोडण्या दिलेल्या आहेत. सांगली जिल्ह्यात नवीन सेवा जोडणी योजनेतून 8506 वीजजोडण्या दिलेल्या आहेत. त्यात पायाभूत सुविधांची आवश्यकता नसलेल्या घरगुती वर्गवारीत 5648, व्यवसायिक 112, औद्योगिक 83 अशा एकूण 6743 वीजजोडण्यांचा समावेश आहे. तर महावितरणच्या खर्चाने आवश्यक पायाभूत विद्युत सुविधांची उभारणी करून घरगुती वर्गवारीत 1369, व्यवसायिक 327, औद्योगिक 67 अशा एकूण 1763 वीजजोडण्या दिलेल्या आहेत.

अर्जदाराला वीज पुरवठा करणे, हे महावितरणचे कर्तव्य आहे. अर्जदाराने परिपूर्ण अर्ज व आवश्यक शुल्क भरल्यानंतर वीजपुरवठा केला जातो. अर्जदाराला वीजपुरवठा देण्यासाठी सध्याच्या विद्युत वाहिन्यांचा विस्तार करणे, नवीन विद्युत वाहिनी उभारणी किंवा विद्युत यंत्रणेची क्षमतावृध्दी करणे इ. आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीची कामे गरजेनुसार करावी लागतात. महावितरणव्दारे पायाभूत सुविधा उभारणी करून ग्राहक वीजसेवेपासून वंचित राहू नयेत, या हेतूने अकृषक ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने परिपत्रकाव्दारे क्षेत्रिय कार्यालयांना निर्देश दिले आहेत. नवीन वीज जोडणी देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणीचा आवश्यक तो खर्च एनएससी योजनेतून करण्यात येतो. यात ग्राहकांना केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल. ग्राहक नॉन डीडीएफ योजनेचा देखील पर्याय निवडू शकतो. अशा ग्राहकास काम पुर्णत्वानंतर पाच समान हप्त्याव्दारे खर्च रक्कमेचा परतावा दिला जातो. ग्राहकास फक्त स्वत:च्या वापरासाठी विद्युत यंत्रणा उभारावयाची असल्यास समर्पित वितरण सुविधा (डीडीएफ) योजने अंतर्गत वीजपुरवठा करण्याचा पर्याय ही उपलब्ध आहे.

                 एनएससी योजनेत अकृषक ग्राहकांना वीजजोडणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणी महावितरणच्या खर्चाने करण्यात येते. ग्राहक योगदान आणि परतावा (नॉन डीडीएफ) योजनेत अर्जदार आवश्यक पायाभूत सुविधा उभारणी स्वखर्चाने करतो. त्या खर्च केलेल्या रक्कमेचा परतावा महावितरणकडून अर्जदारास पाच समान हप्त्याव्दारे दिला जातो. समर्पित वितरण सुविधा (डीडीएफ) योजनेत ग्राहक स्वखर्चाने आवश्यक पायाभूत सुविधा उभारणी करतो. ती फक्त त्या अर्जदारासाठी समर्पित असून महावितरण कंपनीची मालमत्ता असते.


नवीन सेवा जोडणी योजनेतून कोल्हापूर, सांगलीत सहा महिन्यात 19 हजार 553 वीजजोडण्या