बातम्या

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

1958 College applications filed for Acharya Chanakya Skill Development Centers


By nisha patil - 7/19/2024 12:32:32 PM
Share This News:



राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून,  आत्तापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेणार असल्याचे, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

        मंत्री लोढा म्हणाले की, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रावर ऑगस्टपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक-युवतींना महाविद्यालयांमध्येच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" ही नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली आहे.राज्यातील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन  करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. प्रत्यक्षात १९५८ महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे अर्ज दाखल केले आहेत, ही बाब सकारात्मक आहे. 

    मंत्री लोढा म्हणाले की, प्रत्येक कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात प्रतिवर्षी साधारण १,५०,००० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. या योजनेसाठी १५ ते ४५ वयोगटातील सर्व युवक-युवती पात्र आहेत. कालसुसंगत तंत्रज्ञानाचे कौशल्य प्रशिक्षण महाविद्यालयीन युवक युवतींना देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे युवक घडावेत, यासाठी राज्य आणि केंद्र सरकार काम करत आहे.


आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा