बातम्या

19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे कोल्हापूरमध्ये आयोजन

19th Ramesh Desai Memorial Under


By nisha patil - 5/17/2024 11:43:39 PM
Share This News:



कोल्हापूर, 17 मे 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने ऐतिहासिक शहर असलेल्या कोल्हापूरमध्ये 19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देशभरांतून 250 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, कोल्हापूर या ठिकाणी 18 ते 25 मे 2024 या कालावधीत रंगणार आहे. 

एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, स्पर्धेत आकर्षक पारितोषिकांसह पहिल्या फेरीपासूनच एकूण 3 लाख रुपयांची शिष्यवृत्ती खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहे. एआयटीएचे माजी सहचिटणीस आणि एमएसएलटीएचे माजी मानद सचिव रमेश देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हि स्पर्धा वार्षिक तत्वावर आयोजित केली जाते. कुमार स्तरावरील टेनिसच्या विकासासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल रमेश देसाई यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 
 
स्पर्धेचा 16 वर्षाखालील मुलांचा मुख ड्रॉ 64चा, तर मुलींचा ड्रॉ 48चा असणार आहे. स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने शनिवार, 18 मे आणि रविवार 19 मे या दिवशी, तर मुख्य फेरीस सोमवार 20 मे पासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेसाठी आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली कन्नमवार यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे एमएसएलटीएच्या वतीने स्पर्धा संचालक म्हणून निवड करण्यात आलेले एमएसएलटीएचे सहसचिव शितल भोसले व केडीएलटीएचे सचिव मेघन बागवडे यांनी सांगितले.  

केडीएलटीएच्या वतीने सध्याच्या क्रीडा संकुलातील टेनिसच्या कोर्टच्या आधुनिकीकरणाबरोबरच खेळाडूंसाठीचा कक्ष, स्वच्छता गृह, खेळाडूंसाठी कपडे बदलण्याची जागा(चेंजिंग रूम)आदी सुविधांचे नूतनीकरण केले आहे. केडीएलटीएच्या सदस्यांच्या सहभागामुळेच या सर्व गोष्टी करणे शक्य झाल्याचे स्पर्धा समितीचे चेअरमन दिलीप मोहिते यांनी सांगितले. 
  
स्पर्धेच्या संयोजन समितीमध्ये स्पर्धा समितीचे चेअरमन दिलीप मोहिते, अण्णा घाटगे, केडीएलटीएचे खजिनदार आनंद शहा, महेंद्र परमार, डॉ. दिनेश कित्तूर, एसएस मोमीन आणि आशिष शहा यांचा समावेश असून यांच्या सहकार्यामुळेच देशभरातून सहभागी होणाऱ्या खेळाडूंना येथील सर्वोत्तम सुविधेचा लाभ मिळणार आहे. 

आम्हाला युवा टेनिसपटूसाठी हि स्पर्धा संस्मरणीय करायची असून कोल्हापुरमधील संस्कृती व परंपरा याचा अनुभवदेखील त्यांना द्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. 


खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे: मुले: 
1.प्रतीक शेरॉन(हरियाणा), 2.ऋषी यादव(उत्तरप्रदेश), 3.हृतिक कटकम(तेलंगणा), 4.हर्ष मलिक(हरियाणा), 5.कनिष्क खथुरिया(मध्यप्रदेशज), 6.प्रत्युश  लोगनाथन(तेलंगणा), 7. आदित्य आचार्य (ओडिशा), 8. प्रकाश सरन (कर्नाटक)

मुली: 
1. दिव्या रमेश(तामिळनाडू), 2.रिशीता रेड्डी बासिरेड्डी(तेलंगणा), 3.प्रिशा शिंदे(महाराष्ट्र), 4.शेरी शर्मा(हरियाणा), 5.आनंदिता उपाध्याय(हरियाणा), 6. शैवी दलाल(गुजरात), 7.रांझना संग्राम(पंजाब), 8.नैनिका रेड्डी बेन्द्रम(महाराष्ट्र)


19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे कोल्हापूरमध्ये आयोजन