बातम्या

जिल्ह्यातील तीन हजार 85 शाळांमधील 2 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी केली पत्रलेखनातून मतदार जनजागृती

2 lakh 51 thousand students of 3 thousand 85 schools


By nisha patil - 10/26/2024 10:09:18 PM
Share This News:



कोल्हापूर,: जिल्ह्यातील 3 हजार 85 शाळांमधील 2 लाख 51 हजार 278 विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत आवाहन करणारे पत्र लिहून मतदार जनजागृती केली.

जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये 74.11 टक्के मतदान झाले होते. या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून कोल्हापूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी 80 टक्क्यांहून अधिक होण्याच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप चे नोडल अधिकारी एस कार्तिकेयन व कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त तथा स्वीप च्या नोडल अधिकारी डॉ. के मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मतदार जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

     याच अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पत्रलेखनाचा उपक्रम घेण्यात आला. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करणारे पत्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना लिहिले. या पत्राद्वारे निर्भयपणे व योग्य उमेदवारास मतदान करुन लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी या पत्रातून आवाहन करण्यात आले. या उपक्रमात एकूण 3 हजार 85 शाळातील 2 लाख 51 हजार 278 विद्यार्थ्यांनी पत्र लेखन करुन ही पत्रे पोस्टाद्वारे पाठवली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाची आवड निर्माण होऊन बालवयात लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्त्व कळेल तसेच जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबांपर्यंत मतदान करण्याचा भावनिक संदेश पोहोचून मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल. 


जिल्ह्यातील तीन हजार 85 शाळांमधील 2 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी केली पत्रलेखनातून मतदार जनजागृती