बातम्या
20 कुत्र्यांचा दोन महिलांवर हल्ला; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी
By nisha patil - 8/2/2024 4:36:27 PM
Share This News:
देशभरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होते. कारण हे कुत्रे अचानकपणे कोणावरही हल्ला करु शकतात. अशीच एक धक्कादायक घटना पंजाबमधील कपूरथला येथे घडली आहे. येथे जनावरं चरण्यासाठी घेऊन आलेल्या दोन महिलांवर एक दोन नव्हे तर तब्बल 20 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कपूरथलाच्या सुलतानपूर लोधी उपविभागातील पासन कादिम गावात घडली. परी ठाकूर असे या मृत महिलेचे नाव आहे. परी आणि तिची मैत्रिण पिंकी या दोघींजणी सायंकाळी उशिरा आपली जनावरे चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या.त्याचवेळी 15-20 भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. चारी बाजूंनी कुत्र्यांनी महिलांना घेरल्यामुळे त्या स्वत:ची सुटका करु शकल्या नाहीत. कुत्र्यांनी महिलांच्या डोक्यावर अनेक वार केले. त्यामुळे परीचा यात जागीच मृत्यू झाला. तर पिंकीची प्रकृती गंभीर आहे.
पिंकीवर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच कबीरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. तसेच परीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आठवडाभरापूर्वी एका बालकाचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. त्यामुळे परिसरात कुत्र्यांची दहशत असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे.
20 कुत्र्यांचा दोन महिलांवर हल्ला; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी
|