खेळ
आदर्श गुरुकुल विद्यालयात 21 व्या क्रीडा महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन
By nisha patil - 11/28/2024 7:52:16 PM
Share This News:
आदर्श गुरुकुल विद्यालयात 21 व्या क्रीडा महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन
कोल्हापूर, प्रतिनिधी - विक्रम केंजळेकर आदर्श गुरुकुल विद्यालयात 21 व्या क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. माणिक वाघमारे (क्रीडा उपसंचालक, कोल्हापूर), पैलवान मा. आप्पासाहेब कदम (हिंदकेसरी), मा. श्री. प्रशांत तोडकर (पन्हाळा हिल मॅरेथॉन विजेते), आणि माजी विद्यार्थी अक्षय बरकाळे (पाटबंधारे अभियंता), प्रमोद कैकाडी (तलाठी), ओंकार डोईजड (युवा उद्योजक) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात एनसीसी विद्यार्थ्यांच्या मानवंदनेने झाली, तर मैदानावरील एरोबिक्स नृत्याने वातावरण रंगले. विद्यार्थ्यांनी कुस्ती, रोलबॉल, जंपरोप यांसारख्या खेळांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका सौ. एम. डी. घुगरे यांनी प्रास्ताविक केले आणि विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. जिमखाना प्रमुख श्री. एन. ए. कुपेकर यांनी क्रीडा अहवालाचे वाचन केले. राष्ट्रीय खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला.
प्रमुख पाहुणे प्रमोद कैकाडी यांनी आपले अनुभव मांडताना विद्यालयाने त्यांना मिळालेल्या मदतीबद्दल ऋण व्यक्त केले. प्रशांत तोडकर यांनी विद्यार्थ्यांना जिद्दीने पुढे जाण्याचा सल्ला दिला, तर पैलवान आप्पासाहेब कदम यांनी खेळातून करिअर घडवण्याची प्रेरणा दिली. क्रीडा उपसंचालक माणिक वाघमारे यांनी खेळांमुळे करिअरची संधी मिळण्यास महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती दिली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. एस. घुगरे, मुख्याध्यापिका सौ. एम. डी. घुगरे, आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. डी. पाटील आणि सौ. एस. सी. शिखरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मा. श्री. आर. बी. शिवई यांनी केले.
विद्यार्थ्यांचा उत्साह आणि विविध खेळांचे प्रात्यक्षिक पाहून उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाच्या कार्याची प्रशंसा केली.
आदर्श गुरुकुल विद्यालयात 21 व्या क्रीडा महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन
|