बातम्या

राज्य सरोवर संवर्धन योजनेतून 35.97 कोटींचा निधी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार

35 97 crore fund from State Lake Conservation Scheme


By nisha patil - 9/13/2024 8:04:10 PM
Share This News:



जिल्ह्यातील तलावांच्या संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेतून रु. ३५ कोटी ९७ लाखांचा निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार  राजेश क्षीरसागर यांची माहिती

कोल्हापूर दि.१३ : राज्यातील विविध तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणा राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सुकाणू समितीमार्फत कोट्यावधी रुपयांच्या निधीस तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये  कोल्हापूर जिल्ह्यातील दहा तलावांच्या सुशोभीकरण व संवर्धनासाठी रुपये ३५ कोटी ९८ लाखांचा निधी मंजुरीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. निधी मंजुरी बाबत राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळ व सुकाणू समितीचे कोल्हापूर जिल्हा वासियांच्या वतीने जाहीर आभार मानत असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

 राज्यातील काही तलावांची   गेल्या अनेक वर्षात अत्यंत दुरावस्था झाली आहे. तलावाच्या आजूबाजूचे सांडपाणी मिसळत असल्याने तलावातील पाणी प्रदूषित होत आहे. या पाण्यास दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यानुसार या तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेतून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनास देण्यात आल्या होत्या. पर्यावरण विभागाच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेतून सुकाणू समितीमार्फत जिल्ह्यातील  १० तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी रु.३५ कोटी ९७ लाखांच्या निधीस तत्वत: मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.

    त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, यामध्ये प्रामुख्याने मौजे निगवे खालसा येथील गाव तलावास ३ कोटी ५१लाख, मौजे चुये येथील गाव तलावास व ३ कोटी ४ लाख,  मौजे नंदगाव येथील गाव तलावास  ९१लाख,  मौजे हिरवडे खालसा  येथील गाव तलावास रुपये २ कोटी ८० लाख,  मौजे घानवडे येथील गाव तलावास रुपये २ कोटी ८७ लाख, मौजे बाचणी येथील गाव तलावास  रुपये ४ कोटी ९९ लाख, मौजे मजरे कासारवाडी राधानगरी येथील गाव तलावास रूपये २ कोटी ७९ लाख,  मौजे बहिरेश्वर करवीर  येथील गाव तलावास रुपये ४ कोटी २८ लाख, मौजे दऱ्याचे वडगाव करवीर येथील गाव तलावास ७ कोटी ३८ लाख व कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील हनुमान तलावास   रुपये ३ कोटी ३० लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

 मंजूर निधी मधून तलावाच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे, तण काढून टाकणे, सांडपाणी रोखण्यासाठी सरंक्षक भिंत उभी करून सांडपाणी दुसऱ्या मार्गाने निर्गत करणे, दगडी बांधकाम, घाटाचे सुशोभिकरण, फिरण्यासाठी फुटपाथ निर्माण करणे, सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे, सुशोभीकरणासाठी बेंचेस बसविणे, सोलर लाईट बसविणे, कचराकुंडी, दिशादर्शक फलक, ओपन जिम, लहानमुलांची खेळणी बसविणे, पर्यावरणासाठी जल शुद्धीकरणासाठी उपयुक्त झाडे लावणे आणि विरंगुळ्यासाठी बोटिंग सुरु करणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली.


राज्य सरोवर संवर्धन योजनेतून 35.97 कोटींचा निधी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार