बातम्या

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत महानिर्मितीचा ४.४ मेगावाट कुंभोज सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

4 4 MW Kumbhoj Solar Power Project of Mahanirti has been commissioned under Chief Minister


By nisha patil - 5/8/2023 6:06:18 PM
Share This News:



रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाचा वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना" सुरु केली. 

या योजने अंतर्गत ४.४ मेगावाटचा कुंभोज, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्प ५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १ वाजता कार्यान्वित करण्यात महानिर्मितीला यश आले आहे.

या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे कुंभोज आणि हिंगणगाव या दोन गावातील सुमारे १५०० कृषी वीज ग्राहकांना सौर ऊर्जेचा लाभ होऊन, विशेषतः ५ एच.पी.चे सुमारे १०४० कृषी पंप उर्जित होणार आहेत. 

सदर प्रकल्प महावितरणच्या ३३/११ के.व्ही. कुंभोज उपकेंद्राला जोडण्यात आला आहे. सुमारे ९  हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर  हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च १८ कोटी आहे. महानिर्मिती, मेसर्स ई.ई.एस.एल.(विकासक), मेसर्स टाटा (सब व्हेंडर) आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा स्थापित क्षमता  ३७६.०२ मेगावाट इतकी झाली आहे. ह्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीत गावकऱ्यांचे/स्थानिकांचे आणि महावितरणचे विशेष सहकार्य लाभले. 
   
या सौर ऊर्जा  प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर  प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ४० व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. सौर ऊर्जेद्वारे वीज सुमारे रु.३.३० प्रती युनिट दराने महावितरण समवेत वीज खरेदी करार करण्यात आला आहे.

महानिर्मितीचे बोर्गी(जिल्हा-सांगली) २ मेगावाट,  दरीकोन्नूर ६.१६ मेगावाट (तालुका जत जिल्हा सांगली) येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच कार्यान्वित होणार आहेत. 

राज्याचे मा.उप मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री तसेच प्रधान सचिव (ऊर्जा) यांचे निर्देशानुसार आणि महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली महानिर्मितीच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प कामांना गती देण्यात येत असून महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) आणि संपूर्ण  नवीकरणीय ऊर्जा चमू यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.


मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत महानिर्मितीचा ४.४ मेगावाट कुंभोज सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित