बातम्या
जिल्हा परिषद ताराराणी महोत्सवात ४५ लाखांची विक्री
By nisha patil - 10/2/2024 1:47:54 PM
Share This News:
जिल्हा परिषद ताराराणी महोत्सवात ४५ लाखांची विक्री
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : गेल्या सात दिवसांपासून प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या ताराराणी महोत्सवाचा गुरुवारी समारोप झाला. महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या महोत्सवामध्ये सुमारे ४५
लाखांपेक्षा अधिक विक्री झाली. जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या वतीने विभागस्तरीय महोत्सवास दि. २ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली होती. प्रदर्शनामध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यांतील सुमारे २०० बचत गट सहभागी झाले होते. त्यामध्ये ४५ स्टॉल्स खाद्यपदार्थांचे होते.
समारोपप्रसंगी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, प्राचार्य दीपाली पाटील, अलमास सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सर्वाधिक विक्री बचत गटांचा गौरव करण्यात आला. ध्येयस्फूर्ती सरनोबतवाडी, जिजाऊ सोलापूर, महिमा पिरवाडी, यशनंदन निलेवाडी, गगनगिरी गगनबावडा, गवळोबा पेरिड, न्यू बंजारा उस्मानाबाद, सुगरण गारगोटी, वैजनाथ शिनोळी व दुर्गादिवी गवसे या बचत गटांचा समावेश आहे. प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी स्वागत केले.बचत गटांना जि.प.च्या ताराराणी महोत्सवात हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. यामुळेच ग्रामीण भागातील महिला आर्थिक परिस्थिती सुधारणा करू लागल्या आहेत. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने वनिता डोंगरे,सचिन पानारी, , सम्राट पोतदार, सुधीर सांगावकर, चंद्रकांत पाटील,दिपक,माया सुर्वे, गावडे आदींनी परिश्रम घेतले.
जिल्हा परिषद ताराराणी महोत्सवात ४५ लाखांची विक्री
|