राजकीय
हसन मुश्रीफ यांच्या वरदहस्ताने कागल शहरातील 500 कोटी रुपयांचा भूखंड बगलबच्चे व पै- पाहुणे यांचेकडून गिळंकृत
By nisha patil - 11/16/2024 11:13:51 PM
Share This News:
हसन मुश्रीफ यांच्या वरदहस्ताने कागल शहरातील 500 कोटी रुपयांचा भूखंड बगलबच्चे व पै- पाहुणे यांचेकडून गिळंकृत
सनिफ कडगी यांचा आरोप
न्याय मिळवून देण्यासाठी मुळ जमीन मालकांचे समरजितसिंह घाटगेंना सांगावच्या जाहीर सभेत निवेदनाद्वारे साकडे
कसबा सांगाव,प्रतिनिधी. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वरदहस्ताने कागल शहरातील सुमारे 500 कोटी रुपयांचा भूखंड त्यांचे बगलबच्चे व पै- पाहुणे यांचेकडून गिळंकृत केला आहे. असे प्रतिपादन मूळ जमीन मालक सत्ते चाळीस यांचेवतीने वारसदार सनिफ कडगी यांनी केले. ते कसबा सांगाव येथे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी गणपतराव पाटील होते.
या प्रकरणात समरजितसिंह घाटगे यांना स्वतः जातीने लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन मूळ जमिन मालक यांचे वारसदार यांनी दिले.यावेळी मूळ जमीन मालक यांचे वारस, बाबासाहेब जगताप,अभिजीत पोवार,राजन खान,प्रसाद मिराशी,जमीर कडगी उपस्थित होते
कडगी पुढे म्हणाले, कागल येथील सांगाव नाका परिसरातील गट क्रमांक 435 /1 ते 435 /4 चे मूळ मालक 47 जन आहोत. ही जमीन श्री शाहू औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी त्याकाळी संमतीने दिली होती. त्यानुसार 31 ऑगस्ट1981 रोजी ही संस्था नोंदणीकृत झाली. दरम्यानच्या काळात यातील मूळ जमीन मालकांचा मृत्यू झाला. याचा फायदा घेऊन संस्थेशी काडीचाही संबंध नसलेल्या आणि सभासद नसलेल्या कागल मधील काही बड्या नेत्यांच्याकडून मुश्रीफ साहेब यांच्या वरदस्ताने खोट्या कागदपत्राच्या आधारे शाहू वसाहत हे नाव बदलून नव्याने ही संस्था नोंदवली. यामध्ये मूळ मालकांना व संस्थापक सभासदांना वगळले व आपल्या मर्जीतील बेकायदेशीर सभासद वाढवले आहेत. यामध्ये मुश्रीफसाहेब यांचे, चिरंजीव,साडू ,जावई , पै पाहुणे,केडीडीसी बँकेचे कर्मचारी याना बेकायदेशीर सभासदत्व दिले आहे व त्यांना प्लॉट वाटपही केले आहे. याबाबत आम्ही न्यायालयात वेळोवेळी दाद मागितली. परंतु हसन मुश्रीफ यांनी हे प्रकरण दाबल्याने आम्हाला न्याय मिळालेला नाही.
समरजीतसिंह घाटगे म्हणाले, कागल मध्ये पालकमंत्र्यांच्या वरदहस्ताने भ्रष्टाचारी प्रवृत्ती, हुकूमशाही,अरेरावी,दमदाटी, दडपशाही पद्धतीने ही जी बेकायदेशीर कामे होतात,यालाच आपल्याला आळा घालायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कागल मध्ये बदल घडवूया..
यावेळी सरपंच विरश्री जाधव,शिवानंद माळी,कृष्णात पाटील सुकुमार कांबळे सागर कोंडेकर मयूर भंडारे शिवगोंडा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले स्वागत लखन हेगडे यांनी केले.आभार प्रवीण माळी यांनी मानले यांनी मानले
हसन मुश्रीफ यांच्या वरदहस्ताने कागल शहरातील 500 कोटी रुपयांचा भूखंड बगलबच्चे व पै- पाहुणे यांचेकडून गिळंकृत
|