बातम्या
साहित्यिकांना चांगली वागणूक मिळाल्यास देशात चांगले वातावरण : डॉ. सुनिलकुमार लवटे
By nisha patil - 6/27/2023 10:45:29 AM
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी ज्या देशात साहित्यिकांना सन्मानाची वागणूक मिळते त्या देशात चांगल्या प्रकारे वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी केले. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिर व इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आवाडे होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आबासाहेब पाटील (मंगसुळी) यांना इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह, पूजा भडांगे (उस्मानाबाद), पुनीत मतकर (यवतमाळ) यांना लक्षणीय काव्यसंग्रह, सत्यशील देशपांडे (पुणे) यांना उत्कृष्ट गदय साहित्यकृती, विद्या पेठे (मुंबई) यांना उत्कृष्ट कथासंग्रह, वसंत लिमये (पुणे) यांना उत्कृष्ट कादंबरी, विनोद गायकर (मुंबई) यांना उत्कृष्ट बाल साहित्यकृती, विनायक होगाडे (इचल.) यांना युवा पदमरत्न, सुभाष काडाप्पा (इचल.) यांना स्थानिक परिसर साहित्यकृती, प्रेमा खंजिरे (इचल.) यांना उत्कृष्ट वाचक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी साहित्यिक हा मोठा असतो. परदेशात साहित्याला आणि साहित्यिकांना सर्वाधिक जपले जाते, संरक्षण दिले जाते आणि सन्मानपूर्वक वागवले जाते. मात्र , हे भारतात दिसत नसल्याची खंत व्यक्त केली.
यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी साहित्य, संगीत, क्रीडा आणि वस्त्रोद्योगाच्यादृष्टीने जागतिक पातळीवर मँचेस्टर बनणारी सदैव जागी असणारी आणि बेरोजगार विरहीत नगरी झाल्याचे सांगितले.कथासंग्रह पुरस्कार प्राप्त विदया पेठे यांनी वाचनालयाचे काम पाहून पुरस्काराची रक्कम वाचनालयास देणगी म्हणुन दिली. तसेच स्थानिक परिसरातील लेखक सुभाष काडाप्पा यांनीही मिळालेल्या पाच हजार पुरस्कारात एक हजार रुपयांची भर घालून वाचनालयास देणगी दिली.
इचलकरंजी साहित्य संमेलनाचे सचिव डॉ. श्रीवल्लभ मर्दा, ग्रंथालयाच्या अध्यक्ष सुषमा दातार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास अॅड. स्वानंद कुलकर्णी, साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विलास शहा, डॉ. अशोकराव सौंदत्तीकर, सहकार्यवाह डॉ. कुबेर मगदूम, काशिनाथ जगदाळे, उदय कुलकर्णी (तारदाळकर), प्रा. मोहन पुजारी, विश्वनाथ जगदाळे, अॅड. मुकुंदराव अर्जुनवाडकर, दादासाहेब जगदाळे, ग्रंथालयाच्या कार्यवाह माया कुलकर्णी, संस्थेचे संचालक प्रा. सुजीत , संजय सातपुते, राजेंद्र घोडके यांच्यासह साहित्यप्रेमी वाचक, सभासद, श्रोते उपस्थित होते.
साहित्यिकांना चांगली वागणूक मिळाल्यास देशात चांगले वातावरण : डॉ. सुनिलकुमार लवटे
|