बातम्या

तरुणांच्या आकांक्षांना बळ देणारा अर्थसंकल्प - मंत्री मंगल प्रभात लोढा

A budget that empowers the aspirations of the youth Minister Mangal Prabhat Lodha


By nisha patil - 7/24/2024 12:36:44 PM
Share This News:



प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प आज सादर केला.  हा अर्थसंकल्प देशाला विकसित भारताच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून युवा, महिला, शेतकरी आणि गरीब सक्षम होतील. या अर्थसंकल्पात कौशल्य विकास आणि रोजगाराच्या दृष्टीने जाहीर केलेल्या योजना तरुणांच्या आकांक्षाना बळ देतील, अशी प्रतिक्रिया कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे. 

            मंत्री लोढा म्हणाले की, "केंद्र सरकारने रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी विशेष तरतूद केली आहे. प्रधानमंत्री पॅकेज अंतर्गत 'रोजगार संबंधित प्रोत्साहन' या योजनेत तीन प्रमुख योजना जाहीर करण्यात आल्या असून, रोजगार, कौशल्य, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रीत करत सरकारने पाच वर्षांच्या कालावधीसाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या काळात चार कोटींहून अधिक तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा अर्थसंकल्प भारतातील सर्व वर्गांना विशेषतः तरुण पिढीला विकसित बनवणारा अर्थसंकल्प आहे. या महत्त्वकांक्षी अर्थसंकल्पासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे आभार मानतो, अशा शब्दात मंत्री श्री.लोढा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

            "देशातील २० लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट असून, त्यासाठी कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्यावर देखील भर देण्यात येणार आहे. कालानुरूप आवश्यक नवे कौशल्य अभ्यासक्रम सुद्धा सुरु करण्यात येणार आहेत. विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना महाराष्ट्र देखील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची निर्मिती करून, लाखो युवकांना प्रशिक्षण देण्यास सज्ज आहोत. पुढील पाच वर्षात एक कोटी तरुणांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये कौशल्य शिक्षण दिले जाणार आहे, दरमहा ५ हजार रुपये इंटर्नशिप भत्ता आणि सहा हजार रुपयांची एकरकमी मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील 'मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना विद्यावेतन, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज देण्यात येणार आहे. मॉडेल स्किल लोन योजनेद्वारे जवळपास २५ हजार तरुणांना ७.५ लाख रुपयापर्यंतचे कौशल विकास शिक्षणासाठी कर्ज दिले जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्याने त्याचा दुप्पट लाभ महाराष्ट्रातील तरुणांना होईल!" असे देखील कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.


तरुणांच्या आकांक्षांना बळ देणारा अर्थसंकल्प - मंत्री मंगल प्रभात लोढा