बातम्या

इंस्टाग्रामवरील आक्षेपार्ह कमेंटमुळे मलकापूरमध्ये तणाव; पोलिसांकडून गुन्हा दाखल

A case has been registered by the police


By nisha patil - 2/13/2024 7:36:50 PM
Share This News:



मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याच्या घटना सतत समोर येत असून, असाच काही प्रकार बुलढाणा  जिल्ह्यातील मलकापूरमध्ये पाहायला मिळाला आहे. इंस्टाग्रामवरील पोस्टवर एका तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्याने मलकापूर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, एका मोठा जमाव थेट रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करतांना पाहायला मिळाला. मात्र, पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. तर, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे अवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहेत. 

 मलकापूर परिसरातील एका तरुणाने इंस्टाग्रामवरील पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केली होती. काही काळात याची माहिती सोशल मीडियावर पसरली आणि मलकापूर येथे हजारो तरुणांचा समूह रस्त्यावर उतरला. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही वेळात हा जमाव पोलिस स्टेशन समोर पोहचला. तसेच कारवाईची मागणी करत यावेळी प्रचंड घोषणाबाजी सुरु झाली. दरम्यान, याची माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देऊन बंदोबस्त वाढवण्यात आला. तसेच, शहरात देखील मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच, स्वतः अप्पर पोलिस अधीक्षक मलकापूर येथे दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याविरोधात तत्काळ गुन्हा देखील दाखल करण्यात आला. 

तब्बल 300 ते 350 जणांवर गुन्हे दाखल...
इंस्टाग्रामवरील पोस्टवर एका तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्यावर सोमवारी रात्री अचानक मोठा जमाव थेट मलकापूर पोलिस स्टेशन अवरात पोहचला. यावेळी जमावाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे, मलकापूर पोलिस स्टेशन अवरात अवैधरीत्या घुसून धार्मिक घोषणाबाजी व शहरात दहशत निर्माण करणाऱ्या 300 ते 350 जणांवर पोलिसांनी गुन्हे दखल केले आहेत. मात्र, यातील अद्याप किती जणांना ताब्यात घेतल याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान मलकापूर शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्याकडून देण्यात आली आहे. 

अफवांवर विश्वास ठेवू नका...
इंस्टाग्रामवरील पोस्टवर एका तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्याने मलकापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. सोबतच कोणीही अफवा पसरवत असल्यास याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात यावी आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे. सध्या मलकापूरमध्ये शांतता असून, पोलीस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे.


इंस्टाग्रामवरील आक्षेपार्ह कमेंटमुळे मलकापूरमध्ये तणाव; पोलिसांकडून गुन्हा दाखल