बातम्या

शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल

A case of obstructing government work has been registered


By nisha patil - 6/30/2023 12:35:38 PM
Share This News:



कुंभोज/ वार्ताहर( विनोद शिंगे ) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा हातकणंगले तहसिलदार यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करत, बेकायदेशीर जमाव गोळा करून त्यांना धाक दाखवल्या प्रकरणी टोप येथील पाच जणांविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शिवाजी आनंदराव पवार, संभाजी बाबासो पवार, अविनाश ईश्वरा कलगुटगी, अमोल अर्जुन पवार व तानाजी आनंदराव पवार ( सर्व रा. गंगाराम नगर, टोप, ता. हातकणंगले ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा हातकणंगले तहसिलदार सुहास गाडे यांनी काल रात्री स्वतः पोलिस ठाण्यात हजर राहून ही फिर्याद दिली. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : तहसिलदार सुहास गाडे हे बुधवारी ( ता. २८ ) सकाळी शिये फाटा येथून हातकणंगलेकडे निघाले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास शिये फाटा येथे त्यांना गौण खनिज वाहतूक करणारे तीन डंपर दिसले. त्यांनी तात्काळ आपल्या चालकाला मोटार बाजूला घ्यायला लावत डंपर रोखले. डंपर चालकांकडे त्यांनी परवाने मागितले. पण डंपर चालकांनी परवाने दाखविण्याऐवजी शिवाजी पवार यांना घटनास्थळी बोलाविले. शिवाजी पवार यांनी वडार समाजा अध्यक्ष अशी स्वतःची ओळख देत तहसिलदार गाडे यांना तुम्ही अशी कारवाई करू शकत नाही असे म्हणत सुमारे ऐंशी लोकांचा गराडाच घातला. आणि त्यांना बोलण्यात गुंतवून डंपर आडवलेले डंपर सोडून दिले. शिवाजी पवार यांच्या सोबत संभाजी पवार, अविनाश कलगुटगी, अमोल  पवार व तानाजी पवार हे ही होते. मात्र तहसिलदार गाडे यांनी कठोर कारवाईचे संकेत देत पोलिस आणि महसूल प्रशासनाला घटनास्थळी बोलावून घेतले. टोपचे कोतवाल रणजीत कांबळे यांना पंचनामा करायला लावला. आणि वरिष्ठांशी चर्चा करून रात्री अकराच्या सुमारास स्वतः पोलिस ठाण्यात हजर राहून फिर्याद दाखल केली. 


शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल