बातम्या
खड्डेमुक्तीसाठी महापालिके भोवती होणार मानवी साखळी
By nisha patil - 8/13/2024 10:18:21 PM
Share This News:
खड्डेमुक्तीसाठी महापालिके भोवती होणार मानवी साखळी
नागरिक, सामाजिक संस्था उतरणार रस्त्यावर
शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डेमय प्रवासाने नागरिक हैराण झाले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम केल्यानेच शहरातील रस्ते मुदतीआधी खराब झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी या खड्डेमुक्ती आंदोलनाची सुरुवात केली गेली असून या आंदोलनामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी मिस्ड कॉल नंबर जाहीर करण्यात आला होता. यामध्ये आतापर्यंत सात हजारहुन अधिक मिस्ड कॉल आले आहेत.
दर्जेदार रस्ते व्हावेत यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर करावा असे पत्र आप ने महापालिका प्रशासनाला दिले आहे. यावर प्रशासकांकडून ठोस लेखी उत्तर न मिळाल्यास हे घेराव आंदोलनाचे रूपांतर ठिय्या आंदोलनात करून स्वातंत्र्य दिनी महापालिकेसमोर बसण्याचा इशारा आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला आहे.
उद्या चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता मानवी साखळी करून महापालिकेस घेराव घालण्यात येणार असून यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले होते. याला प्रतिसाद म्हणून शहरातील विविध रिक्षा संघटना, श्रमिक संघटना, कोल्हापूर सायकल क्लब, वृक्षप्रेमी आदी सामाजिक संघटनांचा यामध्ये सहभागी होणार आहेत.
तरी कोल्हापुरातील रस्त्यांवरील खड्ड्याचे गांभीर्य समजून सर्व नागरिकांनी उद्या सायंकाळी साडेचार वाजता महापालिकेच्या समोर जमण्याचे आवाहन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
खड्डेमुक्तीसाठी महापालिके भोवती होणार मानवी साखळी
|