बातम्या
अरबी समुद्रातील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या कटाचा झाला खुलासा
By nisha patil - 8/21/2023 4:38:46 PM
Share This News:
महाराष्ट्राच्या पश्चिम टोकाला समुद्रकिनारी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडल्यानं खळबळ उडाली आहे. हे ड्रग्स समुद्राच्या लाटांनी तरंगणाऱ्या पॅकेट्सच्या स्वरूपात किनाऱ्यावर आढळून आले. रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनाऱ्यांवरून सीमाशुल्क विभागानं 250 किलोहून अधिक ड्रग्सचे पॅकेट्स ताब्यात घेतले. प्रशासनाकडून आधीच निर्बंध लादण्यात आलेल्या या ड्रग्सचे प्लास्टिकच्या पिशव्यांचे पॅकेट्स 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या किनाऱ्यांवर वाहून आले. कर्डे ,लाडघर , केळशी , कोलथरे , मुरुड, बुरुंडी, दाभोळ आणि बोर्या समुद्रकिनाऱ्यांवर ही ड्रग्सची पाकिटं जप्त करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर वाहून आलेली ड्रग्सची पाकिटं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहून आली असावीत, असा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. ही अंमली पदार्थांची पाकिटं एकतर समुद्रात पडली असतील किंवा अंमली पदार्थांच्या तस्करीच्या उद्देशानं परदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील, असा संशयही सीमाशुल्क विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा गस्तीदरम्यान, रत्नागिरीतील दापोली सीमाशुल्क विभागाच्या तटरक्षक दलाला कर्डे समुद्रकिनारी वाहून आलेले 10 संशयास्पद पॅकेट्स आढळून आली. तात्काळ ही ड्रग्सची पाकिटं सीमाशुल्क विभागानं ताब्यात घेतली आणि त्यांची तपासणी केली. तपासाअंती चरस असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर केळशी ते बोर्या परिसरात सीमाशुल्क विभागाकडून शोधमोहीम राबविण्यात आली.
15 ऑगस्ट रोजी कर्डे ते लाडघर समुद्रकिनारी सुमारे 35 किलो चरस असलेली प्लास्टिकची पाकिटं आढळून आली. 16 ऑगस्ट रोजी केळशी समुद्रकिनाऱ्यावरून 25 किलो आणि कोलथरे समुद्रकिनाऱ्यावरून 13 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले होते. 17 ऑगस्ट रोजी मुरुड येथून 14 किलोंपेक्षा जास्त, बुरुंडी ते दाभोळ खाडीदरम्यान 101 किलो, तर बोर्या येथून 22 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. नंतर, कोलथरे समुद्रकिनाऱ्याच्या खडकाळ भागातही मोठ्या प्रमाणावर चरस असलेली पाकिटं आढळून आली.
दापोली सीमा शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत कुडाळकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, आमची शोध मोहीम सुरू आहे. तरीही समुद्रकिनारी राहणाऱ्या स्थानिक लोकांना अशी कोणतीही पाकिटं आढळल्यास आमच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन आम्ही करत आहोत. बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगणाऱ्यास 10 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरदूत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.
अरबी समुद्रातील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या कटाचा झाला खुलासा
|