बातम्या
विवेकानंद मध्ये IQAC आणि इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 6/8/2024 11:25:53 AM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये IQAC आणि इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापकांसाठी 'नॅकला सामोरे जाताना' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. आर. कुंभार हे होते.
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सॉफ्ट स्किल्स ट्रेनर डॉ. वैशाली शिंदे उपस्थित होत्या. त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे प्राध्यापकांनी नॅक पियर टीमला सामोरे जाताना कोणत्या बाबींचा अभ्यास आणि विचार करायला हवा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी प्राध्यापक वर्ग हा महाविद्यालयाचा अविभाज्य घटक असून त्यांच्यामध्ये असणारी संवाद कौशल्य आणि शिष्टाचार यांना फार महत्त्व आहे. एकमेकांशी संवाद साधत असताना आपण शाब्दिक, अशाब्दिक, शारीरिक हावभाव तसेच बोलण्याच्या सुरातून व्यक्त होत असतो त्यामुळे कोणता प्रसंग आहे आणि आपण कसे व्यक्त व्हायला पाहिजे याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. प्राध्यापक हे विद्यार्थ्यांच्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असणारे प्रेरणास्थान असायला हवेत. विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता प्रत्येकाच्यामध्ये निर्माण व्हायला हवी.
महाविद्यालयातील लिखित आणि अलिखित अशा सर्व नियमांचे आणि शिष्टाचारांचे पालन काटेकोरपणे सर्वांनी केले पाहिजे. प्रत्येक प्राध्यापकामध्ये सामान्य व्यवहार ज्ञान, समय सूचकता, हजरजबाबीपणा हे गुण असणे आवश्यक आहे. सर्व प्राध्यापक विविध विभागांमध्ये काम करत असले तरी ते एका महाविद्यालयाचा भाग असल्यामुळे संघ भावना निर्माण होणे फार महत्त्वाचे आहे. संघर्ष निर्माण होणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्या मधील नेतृत्व गुण दाखवून समस्येचे निराकरण करता येणे खूप गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. यानंतर प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधून प्राध्यापकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी प्राध्यापकांनी कामाचा अवास्तव ताण न घेता महाविद्यालय हे एक कुटुंब असून माझी जबाबदारी आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केले तर कोणतीही समस्या जाणवणार नाही. महाविद्यालयाच्या वाटचालीमध्ये प्राध्यापकांचा मोठा वाटा आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात रोपट्यास पाणी घालून संस्था प्रार्थनेने झाली. त्यानंतर इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. कविता तिवडे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना महाविद्यालय नॅकच्या चौथ्या सायकलला सामोरे जात असून पियर टीमच्या प्रत्यक्ष भेटीवेळी प्राध्यापकांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली IQAC आणि इंग्रजी विभागाने केले होते.महाविद्यालयातील IQAC विभागाच्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले.
विवेकानंद मध्ये IQAC आणि इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
|