बातम्या

विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी टाकलेले सकारात्मक पाऊल, कृषी विकासाला प्राधान्य - कृषीमंत्री धनंजय मुंडे

A positive step taken to realize the dream of a developed India priority for agricultural development


By nisha patil - 7/23/2024 9:41:20 PM
Share This News:



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने पाहिलेल्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल हा आजचा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राथमिक प्राधान्य देण्यासह आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया  कृषीमंत्री  धनंजय मुंडे यांनी आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.

            केंद्रीय अर्थसंकल्पात ज्या प्रमुख चार घटकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे, त्यामध्ये शेतकरी, गरीब, महिला आणि युवा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. कृषी क्षेत्रासाठी एक लाख 52 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 1 फेब्रुवारी, 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्यामध्ये 1 लाख 27 हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. 27 हजार कोटींची ही भरीव वाढ कृषी क्षेत्राच्या दृष्टीने निश्चितच सकारात्मक आहे.

            हवामान बदल संशोधन यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित  केले असून हवामान बदलांचा परिणाम न होणाऱ्या वाणांचा संशोधन करण्यासाठी मोठी तरतूद केली आहे. तसेच उत्पादकता वाढवण्यासाठी 109 नवीन वाण व बदलत्या हवामानात तग धरणारे 32 बागायती वाण उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढील दोन वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ग्राहक आणि शेतकरी दोघांच्या गरजा भागवल्या जाणार आहेत.

            भाजीपाला उत्पादन आणि मूल्य साखळी तसेच साठवण आणि विपणन व्यवस्थेसाठी शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्था आणि स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

            पुढील तीन वर्षात शेतकऱ्यांचा आणि शेतजमिनीचा कव्हरेज डिजिटल पब्लिक इन्फ्रा मधून करण्यात येणार आहे.  देशातील 400 जिल्ह्यांना डिजिटल क्रॉप सर्वे मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्ड ची संख्या वाढवली जाणार आहे.

            एमएसएमई (MSME) यांना क्रेडीट गॅरंटी दिली जाणार असून याद्वारे कृषी उद्योगांना भरारी मिळेल. तसेच या क्षेत्रात रोजगाराची देखील मोठ्या प्रमाणावर निर्मिती होईल. एकूणच कृषी क्षेत्राचा विकास हीच देशाची प्राथमिकता असल्याचे सिद्ध करणारा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी अभिनंदन करतो, अशा शब्दात कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी टाकलेले सकारात्मक पाऊल, कृषी विकासाला प्राधान्य - कृषीमंत्री धनंजय मुंडे