बातम्या

शालेय शिक्षकांच्या मानसिक जाचातून अकोल्यात एका शाळकरी विद्यार्थ्यानं जीवन संपवलंय

A school student has ended his life in Akola due to the mental examination of school teachers


By nisha patil - 12/3/2024 7:37:22 PM
Share This News:



 अकोल्यात  एका शाळकरी विद्यार्थ्यानं गळफास घेत आपलं जीवन संपवलंय. 15 वर्षीय अल्तमेश बेग इम्रान बेग असं या आत्महत्या  करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. दोन शालेय शिक्षकांच्या मानसिक जाचाला आणि त्यांनी केलेल्या मारहाणीतून आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल अल्तमेशनं उचलल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केलाय. ही घटना अकोला  शहरातील खदान परिसरात राहणाऱ्या अल्तमेशच्या राहत्या घरी घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

अल्तमेश हा इयत्ता 9 वीचा विद्यार्थी असून त्याची याच परिसरात गुरुनानक विद्यालय नावाने शाळा आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे अल्तमेश काल शाळेत गेला असता, काही किरकोळ कारणांवरून शाळेतील दोन महिला शिक्षकांनी त्याला बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर त्याला शाळेतून निलंबित करण्याचीही धमकी देण्यात आली. या धमकीने भयभीत झालेल्या अल्तमेश सायंकाळी घरी परतला आणि स्वत:ला एका खोलीत डांबून घेतले. त्यानंतर याबाबत त्याला विचारणा केली असता, त्याने  शाळेत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. तेव्हा आई-वडिलांनी याकडे फार लक्ष न देता त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. 
त्यानंतर बराच वेळ अल्तमेश त्याच त्या विचारत असतांना तो प्रचंड मानसिक तणावात गेला, परिणामी, सायंकाळी त्याने आपल्या राहत्या घरातीलचं वरच्या खोलीमध्ये अभ्यासासाठी जातो असं सांगून खोलीत गेला. त्यानंतर रात्री बराच वेळ झाल्यावरही तो खाली जेवणासाठी न आल्यानं घरचे लोक त्याच्याकड गेले. पण त्यावेळी त्यांना आपला मुलगा फासावर लटकतांना दिसला. हे दृश्य बघून कुटुंबियांना जबर धक्का बसला. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर  खदान पोलिसांनी घटनास्थाळ गाठत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.  

पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच गुरुनानक शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या प्रकरणाचे नेमके कारण काय हे देखील तपासले जाणार असल्याची माहिती खदान पोलिसांनी दिलीय. मात्र, किरकोळ कारणावरून ही आत्महत्येची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


शालेय शिक्षकांच्या मानसिक जाचातून अकोल्यात एका शाळकरी विद्यार्थ्यानं जीवन संपवलंय