बातम्या

लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक

A separate bank account is required for candidates contesting Lok Sabha elections


By nisha patil - 9/4/2024 5:42:37 PM
Share This News:



 कोल्हापूर, दि. 9  : लोकसभा निवडणूक 2024 लढविणाऱ्या उमेदवारांसाठी एकूण खर्चाची कमाल मर्यादा 95 लाख आहे. उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी किमान एक दिवस अगोदर केवळ निवडणूक खर्चाच्या प्रयोजनासाठी राष्ट्रीयीकृत, सहकारी बँक किंवा पोस्ट कार्यालयात स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.  

       लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे हे स्वतंत्र बँक खाते निवडणूक प्रयोजनासाठी असल्याने विद्यमान कोणतेही खाते वापरण्यात येऊ नये. हे खाते उमेदवाराच्या वैयक्तिक नावाने किंवा उमेदवार आणि त्याचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त नावे उघडता येईल. हे खाते फक्त लोकसभा निवडणूक 2024 च्या जमा-खर्चासाठीच वापरता येणार असून, त्यामध्ये इतर कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. उमेदवारास स्वतः च्या निधीसह इतर स्रोतातून प्राप्त होणारा सर्व निधी स्वतंत्र बँक खात्यात जमा करणे व सर्व खर्चाचे व्यवहार करणे बंधनकारक आहे. उमेदवारास संपूर्ण निवडणूक कालावधीत एक व्यक्ती किंवा संस्थेकडून 10 हजार रुपये रक्कम देणगी अथवा रोख स्वरुपात स्विकारता येईल. एक व्यक्ती किंवा पुरवठादार यांना संपूर्ण निवडणूक काळात 10 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोखीने अदा करता येणार नाही. उमेदवाराने बहुतांश सर्व व्यवहार धनादेश, एनईएफटी, आरटीजीएस किंवा ऑनलाईन पद्धतीने करणे अपेक्षित आहे. 

     नामांकन दाखल करतेवेळी उमेदवाराने बँक खात्याचे तपशील सादर करावे लागतील. निवडणूकीनंतर खर्चाचा तपशील सादर करताना बँक खात्याचे विवरणपत्र सादर करावे लागेल. नामनिर्देशन दाखल केल्यानंतर संबंधित उमेदवाराला दैनंदिन खर्च नोंदवही, बँक नोंदवही व रोख नोंदवही समाविष्ट असेल अशी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पृष्ठांकित व प्रमाणित केलेली दैनंदिन खर्च नोंदवही देण्यात येईल. यामध्ये उमेदवार किंवा प्रतिनिधी यांनी दैनंदिन खर्च नोंदविणे आवश्यक आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याकडून प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू सेवांचे दर अधिसूचित केले आहेत. त्यानुसार उमेदवार, राजकीय पक्ष यांचा दैनंदिन खर्च नोंदविण्यात येईल. उमेदवारांकडून ठेवण्यात आलेल्या खर्च नोंदवहीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियुक्त खर्च निरीक्षक यांच्या मार्फत प्रचार कालावधीत एकूण तीन वेळा तपासणी होणार असून या तपासणीसाठी संबंधित उमेदवार, प्रतिनिधीने उपस्थित राहणे बंधनकारक आहे. 

     लोकसभा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसात उमेदवार, प्रतिनिधी यांनी निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार भाग 1 ते 4 व परिशिष्ट 1 ते 11 मध्ये आपला अंतिम खर्च अहवाल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक खर्च विषयक लेखे विहित नमुन्यात व मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे अन्यथा लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम १० (ए) अन्वये उमेदवारांवर तीन वर्षाकरिता अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.


लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक