बातम्या
शास्त्रीय व निमशास्त्रीय कथ्थक नृत्याचा बहारदार कार्यक्रम संपन्न
By nisha patil - 7/26/2023 7:22:37 PM
Share This News:
इचलकरंजी - प्रतिनिधी येथील पदन्यास नृत्यकला अकादमी आणि रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रल व ॲन्स कमिटी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला 'कथ्थक नृत्यविष्कार' हा शास्त्रीय व निमशास्त्रीय शैलीमधील भारतीय परंपरा जपणाऱ्या नृत्याचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. मनोहर नृत्य रचनांच्या सादरीकरणास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात पदन्यासच्या विविध वयोगटातील लहान मुली, शालेय मुली, युवती आणि महिला विद्यार्थिनींनी आपल्या तालबद्ध रचना सादर केल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी प्रांत ३१७०चे पदाधिकारी आणि प्रसिद्ध कर सल्लागार ॲड. शिवकुमार धड्ड व सौ. शीतल धड्ड आणि इतर मान्यवरांच्या हस्ते नटराज प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी धड्ड यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना "कोणत्याही कलेचे सादरीकरण अंतःकरणपूर्वक केल्यास ती कला रसिकांच्या पर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचते" असे मत व्यक्त केले. सुरुवातीला रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष हसमुख पटेल यांनी स्वागत केले तर पदन्यासचे अध्यक्ष संजय होगाडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे सेक्रेटरी सुरेश रोजे, ॲन्स कमिटीच्या प्रेसिडेंट भारती पटेल व सेक्रेटरी कुसूम रोजे आणि पदन्यासच्या नृत्यशिक्षिका सायली होगाडे व ज्योती सांगले उपस्थित होत्या. याप्रसंगी कार्यक्रमात रोटरी प्रांत ३१७०चे नियुक्त प्रांतपाल अरुण भंडारे यांच्या हस्ते नुकतीच नृत्य विशारद पदवी प्राप्त करणाऱ्या मधुरा रानडे, साक्षी बारवाडे, सिद्धी भस्मे आणि अदिती चिकुर्डे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी भंडारे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
सादरीकरण कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुवंदना व हे गजवदना ही गणेश वंदना सादर करण्यात आली. त्यानंतर छोट्या मुलींनी तू बुद्धी दे आणि हीच आमची प्रार्थना या गीतांवर नृत्य तसेच काही तोडे सादर केले. विविध परीक्षांच्या विद्यार्थिनींनी याप्रसंगी कथ्थक नृत्यातील त्रिताल, रास ताल व मत्त तालाचे सादरीकरण केले. यामध्ये आमद तोडे, थाट, परण, चक्रधार तोडे असे प्रकार कुशलतेने सादर केले.
कार्यक्रमात जय जगदीश्वरी, पग घुंगरू बांध, जगत जननी, सरगम, जग में सुंदर है दो नाम, ऐसी मधुर शाम बिरज में धूम मचाए, महालक्ष्मी अष्टकम, इत्यादी गीतांवर शास्त्रीय व निमशास्त्रीय शैलीत सुरेख नृत्ये सादर करण्यात आली. त्याचबरोबर गझल, ठुमरी, होरी या गीतप्रकारांवर भावदर्शी नृत्यरचना सादर करण्यात आल्या. शेवटी द्रूत लयीमधील तराना सादर करण्यात आला. सर्वच नृत्यांमधील भावदर्शन आणि तालबद्ध सादरीकरणामुळे रसिकांची छान दाद मिळाली.
कार्यक्रमातील सर्व नृत्यांसाठी दिग्दर्शन व पढंत सायली होगाडे आणि ज्योती सांगले यांनी केले. सादरीकरण कार्यक्रमाचे निवेदन ऐश्वर्या खोत आणि मधुरा रानडे यांनी केले तर उदघाटन कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष आबाळे यांनी केले. कार्यक्रमातील उत्तम अशी गायन व हार्मोनियम साथ श्रीधर पाटील यांनी केली तर तबला साथ राजू पाटील यांनी केली. ध्वनी व्यवस्था होगाडे जॉबर यांची होती. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास पालक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शास्त्रीय व निमशास्त्रीय कथ्थक नृत्याचा बहारदार कार्यक्रम संपन्न
|