विशेष बातम्या
चक्क महिला डॉक्टर म्हणून रुग्णालयात वावरणाऱ्या बुरखाधारी पुरूषाला अटक
By nisha patil - 6/15/2023 6:32:42 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम नागपूरच्या एका रुग्णालय परिसरात महिला डॉक्टरच्या वेशात फिरणाऱ्या बुरखाधारी तरुणाला अटक करण्यात आली आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली. जावेद शेख शफी शेख असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
गेल्या 10 ते 12 दिवसांपासून नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या परिसरात एक बुरखाधारी महिला डॉक्टर वावरताना दिसत होती. ही बुरखाधारी महिला डॉक्टर रुग्णालयातील पुरूष रुग्ण आणि त्यांच्या पुरूष नातेवाईकांशी बोलायची आणि त्यांचे मोबाईल नंबर घ्यायची.
गेल्या 15 दिवसांपासून ही महिला रुग्णालयात फिरत असल्याचं आढळून आलं. नवीनच बुरखाधारी महिला डॉक्टर वार्ड तसेच रुग्णालय परिसरात फिरताना दिसून आली. तिच्या हालचालीही संशयास्पद वाटल्यानंतर तिला सुरक्षा रक्षकांनी हटकलं आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. जेव्हा तहसील पोलिसांनी त्या महिलेला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली. त्यावेळी ती बुरखाधारी महिला नसून तरुण असल्याचं समोर आलं.
दरम्यान, रुग्णालयाच्या परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या महिला कर्मचाऱ्यांना त्या कथित बुरखाधारी महिला डॉक्टरवर संशय आला. अखेर बुधवारी त्यांनी तिला थांबवलं आणि जवळच्या तहसील पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला पोलीस स्टेशनला आणून तिची चौकशी केली. त्यावेळी मात्र धक्कादायक प्रकार समोर आला. बुरखा घातलेली व्यक्ती महिला नसून पुरूष असल्याचं समोर आलं.
महिला डॉक्टर असल्याचा बनाव करुन बुरखा घालून फिरणाऱ्या तरुणाचं नाव जावेद शेख असून तो गेले काही दिवस बुरखा घालून फिरत होता. पण त्यानं हे कृत्य का केलं ते मात्र अजून समोर आलेलं नाही. मात्र, तो फक्त पुरुषांशी बोलायचा, पुरुषांचेच मोबाईल क्रमांक घ्यायचा, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा संशय आणखी बळावला आहे. याप्रकरणी आणखी चौकशी सुरू आहे.
आरोपी जावेद शेख हा नागपूरमधील ताजबाग परिसरात राहतो. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळून तीन मोबाईल जप्त करण्यात आले. हे मोबाईल चोरीचे आहेत काय? त्याने ते कुठून आणले? याचा तपास करण्यात येत आहे. तसेच तो रुग्णालयात वेषांतर करून येण्यामागचं कारणंही शोधण्यात येत असल्याचं पोलीस निरीक्षक विनायक घोले यांनी सांगितलं. तसेच मुलं चोरण्यासाठी तर हा तरुण रुग्णालयात येत नव्हता ना? याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
चक्क महिला डॉक्टर म्हणून रुग्णालयात वावरणाऱ्या बुरखाधारी पुरूषाला अटक
|