बातम्या
दूरदृष्टी असणाऱ्या उत्तम नेतृत्वाचा बळी...
By nisha patil - 4/25/2024 5:20:45 PM
Share This News:
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील एक प्रबळ उमेदवार अभ्यासू नेते अर्थतज्ञ चेतन नरके यांनी लोकसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा केली आहे. काही अपरिहार्य राजकीय आणि सामाजिक कारणांमुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागत आहे मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. युवकांचे संघटन व स्वयंरोजगारासाठी फाउंड्री उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी त्या पत्रकार परिषदेत दिली.
चेतन्य नरके हे उच्चशिक्षित उमेदवार असून त्यांनी के आय टी कॉलेज मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन कॉम्प्युटर सायन्स मध्ये मास्टर्स केले आहे. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ रॉंचेस्टर या उत्तम फायनान्स युनिव्हर्सिटी मध्ये एमबीए फायनान्स केले. अमेरिकेमध्ये त्यांनी बऱ्याच उत्तम उत्तम कंपनीमध्ये आयटी क्षेत्रातील आणि फायनान्स क्षेत्रातील मोठ्या पदाच्या नोकऱ्यांचा अनुभव घेतला. त्यानंतर सिंगापूर मध्ये ते स्ट्रॅटेजिक डिरेक्टर या उच्च पदावर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अभ्यासण्यासाठी व त्यांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची नेमणूक झाली. या सर्व प्रवासात ते कोल्हापूरला विसरले नाहीत, उच्चपदस्थ जबाबदाऱ्या पार पाडताना कोल्हापूरच्या संस्कारांची आणि नेतृत्वगुणांची नेहमीच मला मदत झाली असे ते सांगतात. सध्या चेतन नरके थायलंड गव्हर्मेंट मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्याच सोबत युथ डेव्हलपमेंट बँक याचे चेअरमन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अशा अनेक प्रशासकीय नेतृत्व पदांवरती चेतन नरके यांना अनुभव प्राप्त झाला आहे.चेतन नरके सांगतात की आयुष्यात कोणती गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाही त्यासाठी त्यांना संघर्ष करावाच लागला आणि संघर्ष करण्याची बाळकडू त्यांना कोल्हापूरच्या संस्कारातून मिळाले आहे.
चेतन नरकेंसारखा उच्चशिक्षित आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती खासदारकीचा उमेदवार म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला लाभणे ही खरोखरच खूपच अभिमानाची आणि नशिबाची गोष्ट होती. चेतन नरकेंनी कोल्हापुरातील बऱ्याच गावांचा दौरा करून अनेक गावांची माहिती घेऊन जनसंपर्क वाढवला होता. त्याचबरोबर त्यांनी रुरल डेव्हलपमेंट चे उद्दिष्ट ठेवून गावांच्या सर्वांगीण विकासाबद्दल अभ्यास केला होता. यामध्ये त्यांच्या उच्च पदावरील अनुभवांचा सुद्धा बराच वापर त्यांनी करून घेतला होता. चेतन नरके यांच्या मागे कोल्हापुरातील उच्चशिक्षित तरुण मध्यमवर्गीय व नोकरदार यांचा मोठा पाठिंबा व सहानुभूती होती. परंतु कोल्हापूरचे राजकारण हे नेहमीच उमेदवाराची क्षमता शिक्षण अनुभव आणि ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे यांच्यापेक्षा भावनिक मुद्द्यांच्या वरच जास्त फिरत असते. छत्रपती शाहू महाराज आणि संजय मंडलिक लोकसभा उमेदवारीसाठी उभारल्यानंतर एका बाजूस शाहू महाराजांच्या बद्दल कोल्हापूर मराठा साम्राज्याच्या गादीचे वारसदार म्हणून सहानुभूती होती तर संजय मंडलिक हे महायुतीचे उमेदवार व त्यांना मोदींचां पाठिंबा अशा प्रकारचे भावनिक वातावरण तयार झाले होते. या भावनिकतेच्या वातावरणामध्ये अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढविणे इतकेसे सोपे नाही याचा अभ्यास केल्यामुळे नरके यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीतून माघार घेण्याचा वैचारिक निर्णय घेतला. चेतन नरके यांची दूरदृष्टी आणि त्यांची अभ्यासू वृत्ती पाहिली तर सर्वसामान्य लोकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत आणि त्या सोडवण्यासाठीचे त्यांचे व्हिजन पाहता चेतन नरके हे एक परिपूर्ण उमेदवार म्हणून नक्कीच समोर आले असते. कोणत्याही गोष्टीचा तत्त्वनिष्ठ अभ्यास आणि लोकांच्या समस्येची जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर ते वावगं ठरणार नाही...व्यक्तिमत्व आणि अनुभव लोकसभेचे नेतृत्व करण्यासाठी उत्तम असून देखील बेरजेचे राजकारण आणि भावनिकता हे मुद्दे वरचढ ठरणार होते. चेतन नरके यांचा हा निर्णय दूरदृष्टी ने योग्य असला तरी त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याने समाजामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
भावनिकतेच्या राजकारणात आणि पक्षीय राजकारणात एका धोरणी आणि दूरदृष्टी असणाऱ्या उत्तम नेतृत्वाचा बळी गेला असून चेतन नरके यांना मानणाऱ्या मतदारांच्या गटातून नाराजीचे स्वर उमटले. चेतन नरके यांच्या रूपाने एका उत्तम नेतृत्वाला कोल्हापूरकर मुकले असाच निष्कर्ष यावरून काढला जाऊ शकतो.
दूरदृष्टी असणाऱ्या उत्तम नेतृत्वाचा बळी...
|