बातम्या

पासिंगच्या दंडाविरोधात आप चा ठिय्या

AAP stands against penalty of passing


By nisha patil - 5/31/2024 7:33:14 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी दंडात्मक कारवाई थांबवा, अन्यथा मोर्चा काढू - आम आदमी रिक्षाचालक संघटनेचा इशारा

पासिंग न झालेल्या रिक्षा वाहनासाठी दररोज पन्नास रुपये विलंब शुल्क आकारावे असे परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाने काढले आहे. अशाप्रकारे केलेली दंडात्मक कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत आम आदमी रिक्षाचालक संघटनेने आरटीओ कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले.

एकीकडे रिक्षाचे हफ्ते, विविध कर, इन्शुरन्स भरत व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांना कोरोनाच्या काळात आपले काम बंद ठेवावे लागले. संसाराचा गाडा हाकत असताना मुलांचे शिक्षण, आजारपण या सगळ्यासाठी आर्थिक तरतूद रिक्षाचालकांना करावी लागते. त्यातून सावरत असताना अशाप्रकारची दंडात्मक कारवाई करून रिक्षा व्यवसाय संपवण्याचा डाव सरकार आखात असल्याचा आरोप आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला. हा निर्णय मागे न घेतल्यास मोर्चा काढण्याचा इशारा देसाई यांनी दिला.

यावेळी आप रिक्षा आघाडी अध्यक्ष संजय नलवडे, राकेश गायकवाड, बाबुराव बाजारी, शकील मोमीन, आनंदा चौगुले, मंगेश मोहिते, सरदार खान, प्रकाश हरणे, उत्तम वरुटे, अर्जुन करांडे, दत्ता पाटील, गफूर सौदागर, बापू खोत आदी उपस्थित होते.

आंदोलनास आदर्श ऑटो संघटना, राजेंद्रनगर रिक्षा स्टॉप, काँग्रेस प्रणित वाहतूक संघटना, टेम्बलाईवाडी रिक्षा स्टॉप, विजय बेकरी रिक्षा स्टॉप यांनी पाठिंबा जाहीर केला.


पासिंगच्या दंडाविरोधात आप चा ठिय्या