बातम्या
प्रेम विवाह मान्य नसल्याने जावयाचे अपहरण. जीवे मारण्याचा प्रयत्न
By nisha patil - 12/2/2025 4:27:50 PM
Share This News:
करवीर तालुक्यातील भुये इथल्या विशाल मोहन अडसूळ याचे 9 फेब्रुवारीला रात्री अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली होती.त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू होता.दरम्यान मिरज येथील एका अपार्टमेंटच्या फ्लॅटमधून हातपाय दोरखंडाने बांधून ठेवलेल्या अवस्थेतील पीडित विशालची सुखरूप सुटका करण्यात आली.
विशाल अडसूळ याची सात महिन्यांपूर्वी मिरज इथल्या श्रीकृष्ण महादेव कोकरे यांची मुलगी श्रुतीशी इंस्टाग्राम वर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व या दोघांनी आंतरजातीय प्रेम विवाह केला.याचा राग श्रीकृष्ण कोकरे यांच्या मनात होता. जावई विशाल मोहन अडसुळ याचा काटा काढण्याच्या हेतूने भुयेवाडी कमानी जवळून 9 फेब्रुवारीला श्रीकृष्ण कोकरे यांनी साथीदारांसह त्याचे अपहरण केले. गाडीत घालून मिरज येथील एका अपार्टमेंटमधील बंद खोलीत डांबून ठेवले. पोलिसांनी त्याची सुटका करताना हातपाय बांधून त्याला बेदम मारहाण करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी श्रीकृष्ण कोकरे, धीरज पाटील, राजेंद्र कट्टिमणी,यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.या प्रकरणात आणखी चौघांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा पोलिस शोध घेत असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. संशयितांविरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रेम विवाह मान्य नसल्याने जावयाचे अपहरण. जीवे मारण्याचा प्रयत्न
|