बातम्या

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित कोकण रेल्वेला जोडणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला गती

Acceleration of KolhapurVaibhavwadi route connecting the much awaited and popular Konkan Railway


By nisha patil - 12/8/2023 5:23:17 PM
Share This News:



 गेल्या 10 वर्षांपासून प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेला वैभववाडी-कोल्हापूर मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी 3411.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही शिफारस 53 व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या  बैठकीत करण्यात आली आहे. 

उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत  लॉजिस्टिक्स सचिव सुमिता दावरा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत शिफारस करण्यात आली. या बैठकीत तीन रेल्वे प्रकल्प आणि तीन रस्ते प्रकल्प अशा एकूण 28,875.16 कोटी रुपयांच्या सहा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले. हे प्रकल्प सामाजिक व आर्थिक विकासासाठी मल्टीमाॅडल कनेक्टिव्हिटी पुरवतील आणि सध्या अस्तित्वात असलेल्या शहरी आणि रेल्वे पायाभूत सुविधांवरील ताणही कमी करतील असे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या  लॉजिस्टिक्स सचिवांनी बैठकीत माहिती दिली. हे प्रकल्प भविष्यकालीन क्षमतावृद्धीसाठी अतिशय महत्त्वाचे असून प्रकल्पक्षेत्राच्या लॉजिस्टिक्स क्षमतेमध्ये वाढ करतील.
 

देशाच्या विकासातील मैलाचा दगड ठरलेल्या कोकण रेल्वेला जोडण्यासाठी कोल्हापूर वैभववाडी मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणमध्ये औद्योगिक, शेतीसाठी रस्तेमार्गानेच वाहतूक केली जाते. त्यामुळे वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग झाल्यास महाराष्ट्राला लाभ होणार आहेच, पण कर्नाटकमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी औष्णिक कोळशाच्या वाहतुकीला मदत मिळणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादित शेतीमाल बंदरापर्यंत पोहचण्यासाठी, तर कोकणातील खनिजासह अन्य मालाची पश्चिम महाराष्ट्रात वाहतूक करणे सुलभ आणि किफायतशीर होऊन विकासाला चालना मिळणार आहे. 

सन 2015 मध्ये वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली. त्यावेळी या रेल्वेमार्गासाठी तीन हजार 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. त्यानंतर आठ वर्षांपासून  कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा रेल्वेमार्गाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.


बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित कोकण रेल्वेला जोडणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला गती