विशेष बातम्या
गर्भपाताची माहिती न देणाऱ्या पती- पत्नीवर कारवाई होणार: जिल्हाधिकारी राहुल रेखावार
By nisha patil - 5/30/2023 4:27:17 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम एक किंवा दोन मुली असणाऱ्या गरोदर मातेचा 12 आठवड्यानंतर गर्भपात झाल्याचे निदर्शनास आल्यास, अशा महिलांच्या गर्भपाताबाबतची योग्य ती माहिती आरोग्य विभागाने घ्यावी, या महिलेचा गर्भपात कोठे व कशामुळे झाला, याची खरी माहिती न देणाऱ्या पती- पत्नी आणि संबंधित कुटुंबियांवर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय दक्षता पथक समिती ची जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठक वेळी ते बोलत होते. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना केल्या.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी करा. कोणत्याही केंद्रामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होत नसल्याची खातरजमा करुन घ्या. सर्व सोनोग्राफी केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची खात्री करा. सीसीटीव्ही नसणाऱ्या केंद्रांमध्ये तत्काळ सीसीटीव्ही बसवण्याची कार्यवाही करा. गरोदर महिलांची पहिल्या तिमाहीतील नोंदणी वेळेत होत असल्याची खात्री करा.
या सर्व नोंदीची माहिती खासगी सोनोग्राफी केंद्रधारकांनी आरोग्य विभागाला देणे आवश्यक आहे. खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची यादी घेवून शैक्षणिक अर्हता नसणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध तात्काळ कारवाई करा. गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने, पीसीपीएनडीटी कायदा सल्लागार गौरी पाटील तसेच समिती सदस्य उपस्थित होते.
गर्भपाताची माहिती न देणाऱ्या पती- पत्नीवर कारवाई होणार: जिल्हाधिकारी राहुल रेखावार
|