बातम्या

जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई होणार

Action will be taken if there is a deliberate attempt to disrespect the national flag


By neeta - 1/19/2024 2:06:13 PM
Share This News:



 कोल्हापूर दि. 19 (जिमाका) :  राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्लास्टिकचा राष्ट्रध्वजासाठी वापर होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

            स्थानिक पातळीवर नागरिकांनी तसेच जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये,आरोग्य संस्था अशा शासकीय-निमशासकीय यंत्रणा तसेच सामाजिक अशासकीय संस्था व स्थानिक पोलीस यंत्रणा यांना प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही व अशा प्रकारांना पायबंद बसेल याची काळजी घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे. तसेच समारंभानंतर रस्त्यावर किंवा इकडे तिकडे पडलेले राष्ट्रध्वज योग्य तो मान राखून ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

          येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन समारंभ जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थांमार्फत ध्वजारोहणाने साजरा होणार आहे. स्थानिक पातळीवर जनतेमार्फत राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम, निष्ठा, अभिमान दर्शविण्याकरीता वैयक्तिकरित्या छोट्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. काही वेळा राष्ट्रीय कार्यक्रमाच्यावेळी तसेच विशेष कला, क्रीडा प्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्तत: टाकण्यात आल्याचे दिसून येते. नंतर हे राष्ट्रध्वज रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी पडलेले, विखुरलेले आढळतात. हे दृश्य राष्ट्र प्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रध्वजाच्या वापरानंतर त्याचा योग्य तो मान राहील या प्रमाणे ठेवण्यात यावेत. रस्त्यात पडलेले व विखुरलेले राष्ट्रध्वज प्लास्टिकचे असतील तर बरेच दिवस नष्ट होत नसल्याने ते त्याच ठिकाणी पडलेले आढळतात. ही बाब राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने गंभीर असल्याने राष्ट्र ध्वजाकरिता प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही. कागदी ध्वजाचा वापर करताना योग्य तो मान राखणे आवश्यक आहे. असे राष्ट्रध्वज रस्त्यावर व अन्य ठिकाणी फेकून देवू नये. ते खराब झाले असल्यास ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करण्यात यावेत, असे आवाहनही निवासी  उपजिल्हाधिकारी श्री. तेली यांनी केले आहे.
          राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा या संदर्भात शासनाच्यावतीने वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. तसेच जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 कलम 2 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही श्री. तेली यांनी स्पष्ट केले आहे.

 


जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई होणार