बातम्या
अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या हेड कोच भक्ती पवार ए एफ सी ' सी ' लायसन्स पास
By nisha patil - 6/19/2023 5:05:44 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंजू तुरंबेकर या एकमेव ए एफ सी ' ए ' लायसन्स कोच आहेत आणि आता भक्ती पवार या प्रोफेशल लायसन्स घेणाऱ्या दुसऱ्या क्रमांकावरील महिला ठरल्या आहेत.
बेळगांव येथे ६ मार्च ते २७ मे या कालावधीत झालेल्या ए एफ सी 'सी' लायसन्स कोर्समध्ये कोल्हापूरच्या महिला कोच व महिला खेळाडू भक्ती पवार यांनी अतिशय उत्तम पद्धतीने कामगिरी करून यश संपादन केले आहे.
या कोर्समध्ये भारतातील विविध राज्यांतून २४ प्रशिक्षकांनी भाग घेतला होता. प्रॅक्टिकल व लेखी परीक्षा त्याचबरोबर कामाचे ऑनलाईन सादरीकरण या पद्धतीने हा कोर्स घेतला गेला. या कोर्समध्ये नवीन आणि युवा खेळाडूंचा विकास कसा करावा यावर भर दिला जातो.
भक्ती पवार या सध्या अंजू तुरंबेकर यांनी स्थापित केलेल्या अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी व एटी फाउंडेशनमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रोग्रामहेड व हेड कोच म्हणून कार्यरत आहेत. अंजू तुरंबेकर या भक्ती पवार यांना फुटबॉल क्षेत्रात पुढे जाण्यासाठी गेल्या एक वर्षा पासून मार्गदर्शन करत कोचिंगचे धडे देत आहेत.
एटी फाउंडेशनच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर म्हणाल्या ," भक्ती पवार या खूप मेहनती आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत, कामाच्या प्रती त्यांची श्रद्धा वाखाणण्याजोगी आहे. सध्या संपूर्ण अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी आणि एटी फाउंडेशन चे कार्य भक्ती पवारच सांभाळत आहेत. एवढ्या लहान वयात इतकी मोठी जबाबदरी घेणे आणि ती व्यवस्थितपणे पार पाडणे खूप मोठी बाब आहे , याबद्दल मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. गेल्या एक वर्षापासून कोचिंग क्षेत्रात आणि स्वतःमध्ये नेतृत्व करण्याचे गुण कसे विकसित करावे यासाठी मी त्यांना मार्गदर्शन करत आहे. या वर्षभरात त्यांनी खूप प्रगती केली आहे आणि मला नक्कीच वाटते की त्यांचे भविष्य खूप उज्वल आहे. भक्ती पवार या सर्वांसाठी एक प्रेरणा आहेत. त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेल्या ए एफ सी ' सी ' लायसन्स या कोर्समुळे अकॅडमी आणि फाउंडेशनचा विकास होण्यासाठी आणखीन मदत होईल.
कोर्सचे इंस्ट्रक्टर गोव्याचे शेखर केरकर हे होते ते म्हणाले, "भक्ती पवार या युवा प्रशिक्षक आपल्या देशातील दुर्गम भागातील अनेक मुलींसाठी एक प्रेरणा आहेत. बेळगाव येथे आयोजित एएफसी सी डिप्लोमा कोर्स दरम्यान शिकण्यासाठी त्या नेहमीच उत्सुक होत्या. मैदानावर आणि मैदानाबाहेरची कामे पूर्ण करण्यात त्या नेहमीच वक्तशीर असायच्या. त्यांच्यात असणारा सकारात्मक दृष्टीकोन, नियोजन पद्धती आणि त्यांची तयारी मजबूत आहे आणि ही गुणवत्ता त्यांना कोचिंग क्षेत्रात वाढण्यास मदत करेल.
फुटबॉल प्रशिक्षक म्हणून त्यांच्या पुढील वाटचालीत त्यांना यश मिळो अशी मी शुभेच्छा देतो".
अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या हेड कोच भक्ती पवार ए एफ सी ' सी ' लायसन्स पास
|