बातम्या

प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!

After Prakash Ambedkars big statement the discussion started


By nisha patil - 4/27/2024 6:40:33 PM
Share This News:



राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन गट असून प्रामुख्याने यांच्यात लोकसभेच्या सर्व 48 जागांवर लढाई होणार आहे. दरम्यान, विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीने आपले बळ वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला यश आले नाही. दरम्यान, आता वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात, त्यासाठी तयारी करायला हवी, असा प्रस्ताव आम्ही दिला आहे, असं आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत नवं राजकीय समीकरण निर्माण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल तसेच लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीवर भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊ शकतात.आतापासूनच आपण तशी तयारी करायला हवी असा प्रस्ताव मी काँग्रेससमोर ठेवला आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आंबेडकरांच्या या स्पष्टीकरणानंतर आता आगामी विधानसा निवडणुकीत काय होणार, असं विचारलं जातंय. लोकसभा निवडणुकीत वंचित आणि महाविकास आघाडीच्या एकत्रिकरणाचा प्रयोग अयशस्वी ठरला. आंबेडकरांनी अनेक मतदारसंघांवर आपले उमेदवार दिले आहेत. पण आगामी विधानसभा निवडणुकीला ही युती होणार का? असे विचारले जात आहे.

 

आम्ही मुंबईतही उमेदवार देणार आहोत, अशी माहिती प्राकश आंबेडकर यांनी दिली. 'मुंबईत आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना त्यांचा विधानसभा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिली आहे. त्यांना बळीची बकरी करण्यात आलं आहे. भाई जगताप त्या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांना डावलून बाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. काँग्रेसचा या खेळीचा आम्हाला फायदा होणार आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
 

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश व्हावा यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी वंचित आणि महाविकास आघाडीचे घटकपक्ष शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी  आणि काँग्रेस यांच्यात अनेक बैठका झाल्या. पण जागावाटप आणि अन्य मुद्द्यांमुळे या पक्षात एकमत होऊ शकले नाही. आता वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे वेगवेगळ्या मतदारसंघात आपले उमेदवार दिले आहेत. 


प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!