बातम्या
अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही; राष्ट्रवादीच्या आमदाराची भीमगर्जना
By nisha patil - 6/16/2023 4:45:07 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी भीमगर्जना केली आहे. अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही, असा निर्धार त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलून दाखवला. राजेश पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात अनेक वादळं येणार आहेत. ही वादळं थोपवण्याची कामं आपल्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करायची आहेत. तुम्ही माझा 56 वा वाढदिवस साजरा केला, पण मी याठिकाणी सांगू इच्छितो जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री करत नाही, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत राजेश पाटलांचा वाढदिवस साजरा करायचा नाही, अशी शपथ घेऊया. लोकांना अशा प्रकारे त्रास देणार नाही.
त्यांनी पुढे सांगितले की, अशा पद्धतीने वाढदिवस साजरे केल्यानंतर विरोधक जागृत होतात. आज आपण शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिला आहात ही एकी टिकवून ठेवायची आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना एकसंध राहण्याचे आवाहन राजेश पाटील यांनी केले. शरद पवार यांनी भाकरी परतली पण चंदगड विधानसभेची भाकरी परतू नका म्हणत कार्यकर्त्यांना सोबत राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान, मागील महिन्यात अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्यात कागलमध्ये मेळावा घेत पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. एकेकाळी पाच आमदार आणि दोन खासदार देणाऱ्या जिल्ह्यात पक्षाचे केवळ दोन आमदार आहेत. अनेक तालुक्यांत पक्षाची ताकद नाही, हे बरोबर नाही. आता कागलच्या पुढे राष्ट्रवादी नेण्याचा प्रयत्न करा, असे सांगत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलेच खडे बोल सुनावले होते.
अजित पवार म्हणाले होते की, राष्ट्रवादीची स्थापना जिल्ह्यात झाली. त्यावेळी मोठी ताकद होती. ही ताकद वाढणे अपेक्षित होते. मात्र, उलट परिस्थिती आहे. ही ताकद वाढविण्यासाठी जनतेचे प्रश्न हातात घेतले पाहिजेत. रस्त्यावर उतरून आंदोलने केली पाहिजेत. लोकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. केवळ पोस्टर लावून आणि घोषणा देऊन पक्ष वाढत नाही. चांगले काम केले तर लोक तुम्हाला नक्कीच निवडून देतात. जिल्ह्यात पक्षाचा पालकमंत्री असेल तर ताकद मिळते. राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी ते शक्य होते. पतंगराव कदम यांना संधी मिळाली. तेथून काँग्रेस पुढे गेली. आता परत स्थानिक स्वराज्य संस्थांत राष्ट्रवादीला एक नंबरचा पक्ष बनवा. मग जागा वाटपात काय करायचे, ते मी बघतो. यात मी वस्ताद आहे.
अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही; राष्ट्रवादीच्या आमदाराची भीमगर्जना
|