बातम्या
अनं कोलोली गावाने ओढला मरीआई चा गाडा
By nisha patil - 5/16/2024 8:04:24 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रतिनिधी देश दिवसेंदिवस तंत्रज्ञानाच्या युगात असताना गावात मात्र जुन्या प्रथा कायम आजही टिकून आहेत. पन्हाळा तालुक्यात 'मरीआईचा गाडा' ओढला जातो. गाव-गाड्याला रोगराई पासून सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे 124 वर्षांची ही परंपरा अजूनही कायम आहे.
मरीआईचा गाडा ओढण्याच्या परंपरेविषयी सांगताना गावकरी
कोल्हापूर विज्ञान-तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी गावगाड्यातील प्रथा, परंपरा अजूनही पाळल्या जातात. ग्रामीण भागात आजही जुन्या परंपरांनी गावाचा ग्रामीण बाज सजीव ठेवला आहे. 1900 साली कोल्हापुरात आलेल्या महाभयानक प्लेग रोगानं थैमान घातलं होतं. गावागावात प्लेग रोगाला मरीआईचा रोग म्हणून संबोधलं जायचं आणि हीच मरीआई गावात प्रवेश करू नये यासाठी त्या काळापासून आजपर्यंत 'मरीआईचा गाडा' ओढला जातो.
एका गावचा गाडा दुसऱ्या गावच्या हद्दीत सोडण्याची परंपरा : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात गावागावांमध्ये मरीआईचा गाडा सोडला जातो. हा मरीआईचा गाडा म्हणजे ज्या गावात हा गाडा सोडतात त्या गावातील लोक मरतात अशी एक आख्यायिका आहे. याच मरीआईला दुसरं नाव म्हणजे प्लेग हे होतं. आजही प्रत्येक गावामध्ये मरीआईचा गाडा सोडला जातो. जेणेकरून आपल्या गावातील नागरिकांची संख्या कमी होऊ नये हा उद्देश यामागे आहे. मरीआईचा गाडा ज्या गावात आहे त्या गावातील लोक जास्त प्रमाणात मरण पावतात, असंही म्हटलं जातं. यासाठी काय करावं तर तो गावात आलेला गाडा आपल्या गावातून दुसऱ्या गावच्या हद्दीमध्ये नेऊन सोडला जातो.
पहिल्या पावसानंतर ओढल्या जातो गाडा : मान्सूनला सुरुवात होण्याआधी गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन त्या मरीआई देवीची पूजा करतात आणि नारळ, साखर, आंबील, घुगऱ्याचा नैवेद्य दाखवून हलगीच्या तालावर तो गाडा दुसऱ्या गावच्या हद्दीमध्ये सोडून देतात. पुन्हा दुसऱ्या गावातून तो गाडा पुढे-पुढे जात शेवटी तो जंगलात सोडून दिला जातो, अशी आख्यायिका आज समाजात मोठ्या प्रमाणात रुजली आहे. पन्हाळा तालुक्यातील कोलोली या गावात पहिल्या पावसानंतर मरीआईचा गाडा ओढला जातो. आजही आबालवृद्ध या परंपरेत सहभागी होतात. गावाला रोगराई पासून दूर ठेवावं ही यामागची भूमिका असल्याचं गावचे उपसरपंच पी आर पाटील यांनी सांगितलं.
साथीच्या रोगापासून बचावासाठी गावकरी एकवटतात : जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात होते. दूषित पाण्याने गावात रोगराई पसरू नये यासाठी मरीआईचा गाडा पावसाळ्यापूर्वीच गावाबाहेर सोडण्यासाठी गावकरी आसुसलेले असतात. पावसाळ्यापूर्वीच रोगराई गावाबाहेर जावी आणि गावगाडा यापासून सुरक्षित राहावा हीच यामागची भूमिका आहे. मात्र विज्ञान, तंत्रज्ञान कितीही पुढारलेले असले तरीही अजूनही गावागावात ही परंपरा कायम ठेवली जात आहे.
अनं कोलोली गावाने ओढला मरीआई चा गाडा
|