बातम्या
अन् चांद्रयान 3 ला दिलेला काऊंटडाऊन अखेरचा ठरला, ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं निधन
By nisha patil - 5/9/2023 5:14:09 PM
Share This News:
ज्या प्रकल्पामुळे भारताने इतिहास रचला त्या इस्रोच्या चांद्रयान-3 प्रक्षेपणाला काऊंटडाऊन देणारा आवाज होता. इस्रोच्या शास्त्रज्ञ एन. वालारामथी यांचा चांद्रयानसह इस्रोच्या अनेक प्रक्षेपण मोहिमांमध्ये रॉकेट लाँचिंगच्या अगदी आधी होणाऱ्या काऊंटडाऊनमध्ये तुम्हाला एका महिलेचा आवाज ऐकू आला असेल. हाच आवाज आता कायमचा आपल्यातून निघून गेला आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञ एन. वालारामथी यांचं शनिवारी संध्याकाळी चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, त्या 64 वर्षांच्या होत्या. चांद्रयान-3 च्या लाँचिंगसह त्यांनी 30 जुलै PSLV-C56 रॉकेट लाँचिंगला शेवटचा काऊंटडाऊन दिला.
तामिळनाडूतील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या वलारामथी यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भारताच्या पहिल्या स्वदेशी रडार इमेजिंग उपग्रह प्रकल्पाच्या संचालकपदापर्यंत मजल मारली. गेल्या सहा वर्षांपासून त्या इस्रोच्या मिशनसाठी काऊंटडाऊन देत होत्या. एन. वलारमथी या मूळच्या तामिळनाडूतील अरियालूरच्या रहिवासी होत्या. सध्या त्या कुटुंबासह चेन्नईत राहत होत्या. 2015 मध्ये त्यांना अब्दुल कलाम पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं.
इस्रोच्या शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचा जन्म 31 जुलै 1959 रोजी तामिळनाडूच्या अरियालूर येथे झाला. त्याचं सुरुवातीचं शिक्षण निर्मला गर्ल्स हायर सेकंडरी स्कूलमधून झालं. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, कोईम्बतूरमधून त्यांनी इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर अण्णा विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर एन. वलारमथी 1984 मध्ये इस्रोमध्ये रुजू झाला.
इस्रोमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांनी रिमोट सेन्सिंग उपग्रहांच्या प्रक्षेपणाशी संबंधित प्रकल्पांची जबाबदारी सांभाळली. यानंतर त्या यशाच्या पायऱ्या चढत गेल्या आणि डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर ते प्रोजेक्ट मॅनेजर पदापर्यंत मजल मारली. त्यानंतर देशातील पहिला स्वदेशी रडार इमेजिंग सॅटेलाईट प्रकल्प RISAT-1 चं संचालक पद देखील त्यांनी भूषवलं. गेली सहा वर्ष त्या इस्रोच्या मोहिमांच्या प्रक्षेपणाआधी काऊंटडाऊन देत होत्या.
अन् चांद्रयान 3 ला दिलेला काऊंटडाऊन अखेरचा ठरला, ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं निधन
|