बातम्या
अनिल देशमुखांनी तत्कालीन पोलिस अधीक्षकांना धमकावलं... ?
By nisha patil - 7/24/2024 11:13:43 PM
Share This News:
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील एक प्रकरण समोर आलं असून त्यामुळे देशमुखांसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना तत्कालीन एसपींना त्यांनी फोन करून धमकी दिली होती असा आरोप सीबीआयने न्यायालयात केला आहे. एका छोट्या कामासाठी गृहमंत्र्यांनी किती वेळा फोन करायचे? असं म्हणत अनिल देशमुखांनी एसीपीला धमकावलं होतं असा आरोप सीबीआयनं केला आहे. अनिल देशमुखांनी जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांना धमकी दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला अशी माहिती सीबीआयची कोर्टामध्ये दिली.
भाजपचे नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर केला होता. त्या प्रकरणात सीबीआयने सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला असून त्यामध्ये अनिल देशमुखांनी एसपीला धमकी दिल्याचा दावा केला आहे. गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारदाराची तक्रार नोंदवून घ्या असे आदेश अनिल देशमुखांनी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना दिले होते. पण हा गुन्हा जळगावच्या हद्दीत नाही, त्यामुळे पुण्यात हा गुन्हा नोंदवावा अशी भूमिका प्रवीण मुंडे यांनी घेतली. परंतु गृहमंत्री अनिल देशमुखांनी त्यांचं ऐकून घेतलं नाही, त्यांनी गुन्हा नोंदवून घ्यायला भाग पाडल्याचा आरोप आहे. प्रवीण मुंडे यांनी याबाबतची कबुली सीबीआयला दिली असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
जळगावमधील एका शिक्षण संस्थेमधील बोर्डवर गिरीश महाजन संचालक होते. त्या शिक्षण संस्थेचा ताबा कुणाकडे असावा यावरून वाद झाला. यामध्ये गिरीश महाजन यांनी इतर संचालकांवर दबाव आणल्याचा आरोप होता. या प्रकरणी गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुणे पोलिसांनी जळगावमध्ये जाऊन तपास केला होता. त्यावेळी तत्कालीन अनिल देशमुखांनी आपल्यावर दबाव आणल्याचा दावा जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांनी केल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. अनिल देशमुखांनी नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर लगेचच देशमुखांविरोधातील हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
अनिल देशमुखांनी तत्कालीन पोलिस अधीक्षकांना धमकावलं... ?
|