बातम्या
"मुख्यमंत्री वयोश्री योजना"चा लाभ घेण्याचे आवाहन
By nisha patil - 4/7/2024 7:55:02 PM
Share This News:
केंद्र शासनाने दारिद्रय रेषेखालील संबंधित दिव्यांग, दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारिरीक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरविण्याची "मुख्यमंत्री वयोश्री योजना" सुरु केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
सन 2011 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे. त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण 10-12 टक्के ज्येष्ठ नागरिक (1.25 ते 1.50 कोटी) आहेत. त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो. या योजनेतंर्गत लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. तसेच शहरी भागाकरिता महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
ही बाब विचारात घेवून राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ.द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणासाठी एकवेळ एक रकमी 3 हजार रुपये पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण करण्यात येणार आहे. या करीता राज्यात "मुख्यमंत्री वयोश्री योजना" राबविण्यास मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे आवश्यक आहेत. पात्र लाभार्थ्यांसाठी अर्ज ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा व क्षेत्रीय कार्यालयामध्ये विनामूल्य उपलब्ध करुन दिले आहेत. शासकीय सुट्टी, शनिवार, रविवार वगळता शासकीय कामकाजाच्या दिवशी 11 ते 5 या वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण कोल्हापूर कार्यालयात अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत, असेही श्री. साळे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
"मुख्यमंत्री वयोश्री योजना"चा लाभ घेण्याचे आवाहन
|