बातम्या

नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ चा अर्ज

Application form of Chief Minister Majhi Ladki Baheen can be filled through Nari Shakti Dut app


By nisha patil - 10/7/2024 11:22:57 PM
Share This News:



राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा अर्ज ‘नारी शक्ती दूत’ या ॲपवरूनही भरता येणार आहेत.

            ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांनी गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, लाभार्थी महिलांना हे ॲप डाऊनलोड करून घेता येईल. अर्जासमवेत भरावयाची माहिती कागदपत्रे अशी : आधार कार्डची प्रत (दोन्ही बाजूने), महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र सादर करावे. परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे.

            उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे.) मात्र, पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे. त्यासाठी  रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची एका पानावर प्रत घेऊन ती अपलोड करावी. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अनिवार्य नाही. मात्र, असल्यास अपलोड करावी.

            अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविकांनी करावयाची कार्यवाही : अर्जदाराने सर्व माहिती अचूक भरल्याबाबतची खातरजमा करावी, अर्जदार महिलेचा बँक तपशील व त्यासंबंधीची कागदपत्रे तपासून घ्यावीत. बँक खाते आधार संलग्न आहे किंवा कसे याची नोंद घ्यावी. नसल्यास आधार संलग्न करण्याबाबत संबंधित महिलेला माहिती द्यावी. अर्जदारास इतर आवश्यक ते सहकार्य करावे. आवश्यकतेनुसार अर्जदाराकडून त्रुटी पूर्तता करून घ्यावी. तालुकास्तरीय समितीने तयार केलेल्या तात्पुरत्या यादीबाबत आक्षेप आल्यास आक्षेप एकत्रित करून तालुका समितीकडे सुपूर्द करावेत. तालुका समितीच्या सूचनानुसा कार्यवाही करावी.

            तालुकास्तरीय समितीने करावयाची कार्यवाही : क्षेत्राची माहिती संकलित करणे, क्षेत्रीय यंत्रणांना मार्गदर्शन करणे, लाभार्थी महिलांची गावनिहाय तात्पुरती यादी तयार करून प्रसिद्ध करणे, वेळोवेळी बैठका घेणे, प्राप्त आक्षेप, त्रुटींची पूर्ततेची यादी पडताळणी करून तात्पुरती सुधारित पात्र, अपात्रतेची यादी जिल्हा समितीकडे सादर करणे.

            जिल्हास्तरीय समितीने करावयाची कार्यवाही : प्राप्त झालेल्या यादीची तपासणी करून अंतिम यादी तयार करणे, योजना अंमलबजावणी आढावा घेणे, प्रचार- प्रसिद्धी करणे, योजनेसाठी लागणाऱ्या निधीची मागणी व मार्गदर्शक सूचनेनुसार अन्य कार्यवाही करणे.

            राज्यस्तरीय समितीने करावयाची कार्यवाही : मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ कक्ष व कॉल सेंटर कार्यान्वित करणे, योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, योजनेसाठी लागणाऱ्या निधीची शासनाकडे आवश्यकतेनुसार मागणी व मार्गदर्शक सूचनेनुसार अन्य कार्यवाही करणे असे कामकाज आहे.


नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ चा अर्ज