बातम्या

मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

Applications should be made by August 30 for vocational courses


By nisha patil - 3/8/2024 8:22:16 AM
Share This News:



सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेले दसरा चौक येथील गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. 2 हे वसतिगृह वगळून 17 मुला- मुलींचे शासकीय वसतिगृहे व्यावसायिक अभ्यासक्रमास कार्यरत आहेत. सन 2024-25 या वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी 30 ऑगस्टपर्यंत अर्ज जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

यानुसार पहिली प्रवेश निवड यादी अनुक्रमे दि.04 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार वसतिगृहातील प्रवेश निश्चिती दि.10 सप्टेंबर 2024 राहील. त्यानंतर रिक्त जागेवर दुस-या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड दि.13 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्रवेश निश्चितीचा दिनांक 19 सप्टेंबर 2024 राहील.

सन 2024-25 मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु असून 31 जुलै 2024 पासून https://hmas.mahait.org या पोर्टलव्दारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. व्यवसायिक अभ्यासक्रमात अथवा अव्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्ज पोर्टलवरुन डाऊनलोड करुन त्याची प्रिंट घेऊन संबंधित वसतिगृहास ऑफलाईनरित्या सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी 31 जुलै 2024 पूर्वी थेट संबंधित वसतिगृहात ऑफलाईन अर्ज सादर केले असतील त्यांनी देखील ऑनलाईन अर्ज पोर्टलव्दारे भरणे आवश्यक असून ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंटप्रत संबंधीत वसतिगृहास सादर करणे आवश्यक राहील.

                 सन 2024-25 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाचे जिल्हानिहाय  तालुकानिहाय  प्रवर्गनिहाय किती जागा रिक्त आहेत, त्याबाबतचा तपशिल सोबत जोडण्यात आलेला आहे. त्यानुसार वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, नाष्टा, दोन्ही वेळेचे जेवण  राहण्याची सोय, ग्रंथालय, निर्वाह भत्ता, मनोरंजन कक्ष, जीम-साहित्य इत्यादी प्रकारच्या सोयी विनामूल्य उपलब्ध करुन दिल्या जातात.

इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर विचारे माळ, बाबर हॉस्प‍िटल जवळ, कोल्हापूर येथे समक्ष किंवा दूरध्वनी क्र.0231-2651318 वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. साळे यांनी केले आहे.


मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत