बातम्या
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत
By nisha patil - 7/15/2024 7:16:16 PM
Share This News:
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार सन 2023-24 देण्यात येणार असल्याने या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील विरशैव-लिंगायत समाजातील इच्छुक व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी सन 2023-24 या वर्षासाठी रितसर अर्ज करुन हे अर्ज दिनांक 27 जुलै, 2024 रोजी पर्यंत (सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत) सहायक आयुक्त, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराबाबत 8 मार्च, 2019 रोजी शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. या शासन निर्णयान्वये विरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक, प्रबोधन व साहित्यीक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद, दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरुन या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसाऊन पुढे यावेत याकरीता व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थेसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत.
समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिकांसाठी आवश्यक पात्रताः- या योजनेनुसार विरशैव-लिंगायत समाजाकरिता समाजकल्याण, समाज संघटनात्मक, कलात्मक अध्यात्मिक प्रबोधन आणि साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे तथा कल्याणासाठी झटणाऱ्या नामवंत समाजसेवक, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक असावेत. वीरशैव-लिंगायत समाजासाठी कार्य करणारे समाजकल्याण, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कमीत कमी दहा वर्षे कार्य केलेले असावे. पुरस्कार देतांना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय पुरुषांचे वय 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे व स्त्रियांचे वय 40 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त असावे. अपवादात्मक प्रकरणी वरील वय शिथिल करण्याचे अधिकार शासनाने यासाठी नियुक्त केलेल्या समितीकडे राहतील. कोणत्याही व्यक्तीस एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. पुरस्कार मिळण्यास पात्रता व्यक्तिगत, मौलिक कार्यावरुन ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा या बाबतीत विचार करण्यात येणार नाही. पुरस्कार मिळण्यास आमदार, खासदार, जिल्हा परिषद सभासद किंवा कोणताही लोकप्रतिनिधी पात्र असणार नाही. वरील क्षेत्रात कमीत कमी 10 वर्षे वैयक्तिक किंवा संघटनात्मक अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारास पात्र असतील.
सामाजिक संस्थांसाठी पात्रताः-
समाजकल्याण क्षेत्रात वोरशैव लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अध्यात्मिक विकास करणे, अन्याय निर्मलुन करणे, अंधश्रध्दा रूढी निर्मुलन करणे, सामाजिक न्याय मिळवून देणे, समाजाला आरक्षण व संरक्षण मिळवून देणे, सामाजिक व संघटनात्मक जनजागरण करणे इ. क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल. संस्था पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट 1960 खाली संस्था नोंदणीकृत्त असावी, स्वयंसेवी संस्थेचे वरील क्रमांक 1 मध्ये दर्शविलेले समाजकल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य 10 वर्षाहुन अधिक असावे, विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थांच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्याचेअधिकार शासन नियुक्त समितीस राहतील. स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी, तसेच तिचे कार्य व सेवा ही पक्षातीत व राजकारणापासून स्वतंत्र व अलिप्त असावी. वीरशैव लिंगायत समाजसेवा आणि समाजाचा विकास या क्षेत्रातील कामाचा विचार करुनच हा पुरस्कार स्वयंसेवी संस्थाना दिला जाईल.
अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती नेर्लीकर यांनी केले आहे.
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत
|