बातम्या
संजय पाटील यांची महावितरणच्या मुख्य अभियंता पदावर नियुक्ती
By nisha patil - 2/17/2025 9:52:23 PM
Share This News:
संजय पाटील यांची महावितरणच्या मुख्य अभियंता पदावर नियुक्ती
प्रकाशगड, मुंबई येथे वीज खरेदी विभागाचा पदभार स्विकारला
कोल्हापूर | प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगे (ता. करवीर) येथील संजय पाटील यांची महावितरणच्या मुख्य अभियंता पदावर सरळ सेवेतून निवड झाली असून, त्यांनी प्रकाशगड, मुंबई येथील वीज खरेदी विभागात नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते महावितरणच्या वाशी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते.
शैक्षणिक व व्यावसायिक प्रवास
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या संजय पाटील यांनी आपले प्राथमिक शिक्षण बालिंगे हायस्कूलमध्ये पूर्ण केले. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदविका शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर आणि अभियांत्रिकीची पदवी पुणे विद्यापीठातून मिळवली.
२००४ साली ते तत्कालीन एमएसईबीमध्ये कनिष्ठ अभियंता (चाचणी) या पदावर रुजू झाले. त्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता अशी प्रगती साधत, त्यांनी महावितरणच्या विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, वाशी आणि मुंबई येथे कार्यरत राहून त्यांनी वीज ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिली आहे.
उल्लेखनीय योगदान
- महावितरणच्या उच्चदाब ग्राहकांसाठी केव्हीएएच (KVAH) बिलिंग प्रणाली लागू करण्यात मोलाची भूमिका.
- घारापुरी बेटावर समुद्रातून वीज पुरवठा सुरू करण्याच्या मोहिमेत विशेष योगदान.
- महावितरणच्या चाचणी प्रयोगशाळेसाठी प्रथमच आंतरराष्ट्रीय ‘एनएबीएल मानांकन’ मिळवण्यात महत्त्वाची भूमिका.
संजय पाटील यांच्या या निवडीबद्दल कोल्हापूर आणि बालिंगे परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
संजय पाटील यांची महावितरणच्या मुख्य अभियंता पदावर नियुक्ती
|