बातम्या

संगांयो अंतर्गत पात्र ७१७ लाभार्थ्यांना मंजूरी : अनिल डाळ्या यांची माहिती

Approval of 717 eligible beneficiaries under Sangayo


By nisha patil - 9/15/2023 8:03:33 PM
Share This News:



इचलकरंजी/प्रतिनिधी - येथील इचलकरंजी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक गुरुवारी पार पडली. त्यामध्ये विविध योजनेतील ७१७ पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. या सर्वच पात्र लाभार्थ्यांच्या पुढील कार्यवाहीची पुर्तता करुन या सर्वांना दिवाळीपूर्वी अनुदान मिळवून देऊ, असे समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल डाळ्या यांनी सांगितले.

निराधारांना आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निराधारांना दरमहा अनुदान (पेन्शन) दिले जाते. यापूर्वी या योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा मिळणार्या  १००० रुपये अनुदानात जुलै २०२३ पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारने ५०० रुपयांची वाढ करुन ते १५०० रुपये केले आहे.
 

इचलकरंजी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक अध्यक्ष अ‍ॅड. अनिल डाळ्या यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये संगांयो २३८ श्रावणबाळ योजना ३९४, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना ३९, इंदिरा गांधी विधवा योजना ४९ असे ७१७ अर्ज मंजूर करण्यात आले. या सर्व पात्र लाभार्थ्यांचे पोष्टात खाते उघडण्यासह पुढील कार्यवाही लवकरात लवकर करुन या सर्वच लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान मिळवून देऊन त्यांची दिवाळी गोड करणार असल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. डाळ्या यांनी सांगितले.केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार हे गतीमान सरकार वेगाने विकासकामे करत असून संगांयो योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात मोठा आधार निर्माण केल्याचेही डाळ्या यांनी सांगितले.
 

या बैठकीस अप्पर तहसिलदार मनोज ऐतवडे, समिती सदस्य जयप्रकाश भगत ,कोंडीबा दवडते, सुखदेव माळकरी, संजय नागुरे, सरीता आवळे, महेश ठोके, महेश पाटील, जयप्रकाश भगत, तमन्ना कोटगी, नायब तहसिलदार पोळ, अव्वल कारकुन शिला चिखलीकर, रेखा कांबळे आदी उपस्थित होते.


संगांयो अंतर्गत पात्र ७१७ लाभार्थ्यांना मंजूरी : अनिल डाळ्या यांची माहिती