बातम्या
कोल्हापुरात एनसीसी हेडक्वार्टरमध्ये एअरविंग सुरु करण्यास मंजुरी
By nisha patil - 9/16/2023 11:13:56 PM
Share This News:
कोल्हापुरात एनसीसी हेडक्वार्टरमध्ये एअरविंग सुरु करण्यास मंजुरी
-आमदार सतेज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
- एएआयकडून ३० वर्षांसाठी २.३५ एकर जागा मंजूर
कोल्हापूर - एनसीसीच्या कोल्हापूर हेडक्वार्टरमध्ये एअरफोर्स प्रशिक्षण देणारी एअरविंग सुरु करण्याची मागणी मान्य झाली आहे. भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडून (एएआय) कोल्हापूर विमानतळ येथे एअर एनसीसी युनिटच्या फ्लाईंग ट्रेनिंग हब उभारण्यासाठी २.३५ एकर जागा ३० वर्षाच्या लीजवर देण्यास मंजुरी मिळाली आहे. विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना करिअरची नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकणारे एअरविंग एनसीसीच्या कोल्हापूर हेडक्वार्टरमध्ये सुरु करावे असा प्रश्न पावसाळी अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांनी 3 ऑगस्ट 2023 रोजी विधानपरिषदेत मांडला होता. या प्रश्नावर मंत्री संजय बनसोडे यांनी उत्तर देताना कोल्हापूर एनसीसी हेडक्वार्टर मध्ये एअरविंगसाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगीतले होते.
कोल्हापुरात १९६० पासून एनसीसीचे ग्रुप हेडक्वार्टर सुरु आहे. याठिकाणी २१ हजार कॅडेट कार्यरत आहेत. आर्मीच्या ८ व नेव्हीचे १ युनिट कार्यरत आहे. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरच्या माध्यमातून आर्मी व नेव्हीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. मात्र एअरफोर्सचे प्रशिक्षण उपलब्ध नव्हते. श्री दादूमामा ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर देसाई (माजी वायु सैनिक ) यांनी कोल्हापूरात एनसीसीचे हेडक्वार्टर सुरु व्हावे म्हणुन गेली ११ वर्षे आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. कोल्हापूरात विमानतळ उपलब्ध असल्याने एअरविंग एनसीसी सुरु करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली होती. तत्कालीन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
आमदार सतेज पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलली होती. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी झालेल्या एएआय बोर्डच्या बैठकीत कोल्हापूर विमानतळ येथे एअर एनसीसी युनिटच्या फ्लाईंग ट्रेनिंग हब उभारण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच यासाठी २.३५ एकर जागा ३० वर्षाच्या लीजवर देण्यासही मंजुरी मिळाली असल्याची माहीती आमदार सतेज पाटील यांनी दिली.
प्रतिक्रिया
कोल्हापूरच्या एनसीसी मुख्यालयात केंद्राचा एअर फोर्सचा अभ्यासक्रम सुरु व्हावा यासाठी मी पाठपुरावा केला त्याला यश आले असून कोल्हापूरसह ४ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे....'आमदार सतेज पाटील'
कोल्हापुरात एनसीसी हेडक्वार्टरमध्ये एअरविंग सुरु करण्यास मंजुरी
|