बातम्या

पुण्यातील उरुळी कांचन येथे शाळेच्या गेटबाहेरच दोन गटांत तूफान राडा

At Uruli Kanchan in Pune, a storm broke out in two groups outside the school gate


By nisha patil - 12/28/2023 6:13:01 PM
Share This News:



पुण्यातील उरुळी कांचन येथे शाळेच्या गेटबाहेरच दोन गटांत तूफान राडा

पुण्यातील उरुळी कांचन ग्रामपंचायत  हद्दीतील एका शाळेच्या गेटबाहेर दोन अल्पवयीन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. जवळपास 20 ते 25 जणांमध्ये बुधवारी संध्याकाळी हाणामारी झाली. बॅट, लाकडांसह इतर गोष्टींच्या मदतीने दोन गटात हाणामारी झाली. काही जणांना किरकोळ जखम झाली. हा वाद नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. उरुळी कांचनमधील स्वामी विवेकानंद अकॅडमी शाळेच्या गेटसमोर बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता राडा झाला. 

 बुधवारी सायंकाळी स्वामी विवेकानंद अकॅडमी या शाळेच्या गेटसमोर पांढरस्थळ परिसराकडे जाणाऱ्या दोन अल्पवयीन गटांमध्ये अचानक मारहाण सुरु झाली.  लोणी काळभोर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र तोपर्यंत ती मुलं पळून गेली होती. या मारहाणीचे कारण अद्यापही समोर आले नाही. दुसऱ्या बाजूला, पोलीस आता नेमक्या अशा तरुणाईवर काय चाप लावतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही चालकांसह नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली नाही. त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेत या सर्व घटनाचे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले. हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा गोंधळ झाला. मात्र, या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत त्या तरुणांनी तेथून पोबारा केला होता. मागील काही दिवसांपारून महाविद्यालयीन परिसरात दोन गटात होणाऱ्या वादाचे प्रमाण वाढलेय. दोन आठवड्यापूर्वीच महात्मा गांधी विद्यालयाबाहेरही असाच प्रकार घडला होता. सातत्याने होत असलेल्या घटनेमुळे पोलिसांचा धाक राहिलाय का? असा सवाल उपस्थित होतोय. मागील दोन दिवसांपासून उरुळी कांचनमधील स्वामी विवेकानंद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत. बुधवारी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाने याचा शेवट होता. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमात दंग होते. या घटनेतील मुलांचा शाळेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शाळेतील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

उरुळी कांचनमध्ये भर रस्त्यात घडलेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण झालेय.  परिसरात या फ्री स्टाईल हाणामारीची चर्चा चवीने होतेय. ही मुलं नेमकी कोण होती? कोणत्या कारणामुळे दंगा झाला... यासारख्या प्रशांची शहरात चर्चा सुरु आहे. शाळेच्या गेटसमोरील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. पोलीस याप्रकणाचा पुढील तपास करत आहेत.


पुण्यातील उरुळी कांचन येथे शाळेच्या गेटबाहेरच दोन गटांत तूफान राडा