बातम्या
गार्डन्स क्लब,कोल्हापूर तर्फे शाळांमध्ये विविध संस्थांमध्ये रंगांसाठी प्रबोधन
By nisha patil - 3/29/2024 2:14:58 PM
Share This News:
गार्डन्स क्लब,कोल्हापूर तर्फे शाळांमध्ये विविध संस्थांमध्ये रंगांसाठी प्रबोधन
रंगपंचमी साठी लागणारे नैसर्गिक रंग घरी कसे बनवायचे याची क्लब मार्फत प्रात्यक्षिके घेतली गेली .रोटरी क्लब ऑफ गार्गीस बरोबर घेतलेल्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला .रंगपंचमी सणाला आबालवृद्ध रंगांचा वापर करतात .बाजारातील रंग केमिकल युक्त असतात. याच्या वापराने त्वचेची,शरीराची ,डोळ्यांची,केसांची अपरिमित हानी होते . त्वचेवर पुरळ,अलर्जी उठते.डोळ्यात थोड्या प्रमाणात जरी रंग गेला तरी कायमचे अंधत्व येऊ शकते.
केसांच्या तक्रारी सुरु होतात.केस गळणे,शुष्क होणे या समस्या येतात.केमिकल युक्त रंग वापरल्यावर ते धुण्यासाठी भरपूर पाणी लागते तसेच हे रंग मातीत मिसळून मातीचा दर्जा पण खालावतो .हे सर्व टाळण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करुन सण साजरे केले पाहिजेत .निसर्गामध्ये असे अनेक नैसर्गिक पदार्थ आहेत की त्याचा वापर करुन आपण रंग बनवू शकतो .बिटा पासून लाल,पालेभाज्यांपासून हिरवा , गोकर्णाच्या फुलापासून निळा ,ओली हळद -शेवंती - पिवळ्या फुलांच्या पाकळ्यापासून पिवळा ,गुलाबाच्या पाकळ्या पासून गुलाबी -लाल असे रंग तयार करता येतात . त्याचप्रमाणे काही झाडांच्या बिया जसे शेंदरी(बिक्सा) ,कुंकू तुळस यांच्या बियापासून अर्क काढून त्यापासून रंग बनवता येतात. असे रंग सुरक्षित असतात.अगदी लहान मुलांच्या नाजूक त्वचेला सुद्धा यापासून अपाय होणार नाही.हे रंग तुलनेने थोडे महाग असतात आणि हे बनवण्या साठी थोडे कष्ट घ्यावे लागतात .पण याचे काहीही घातक परिणाम होत नाहीत .या सर्व गोष्टींचा विचार करूनच गार्डन्स क्लब ने यंदा हा उपक्रम करण्याचे ठरवले .प्राजक्ता चरणे व संगीता सावर्डेकर यांनी PPT द्वारे आणि प्रात्यक्षिक द्वारे रंग बनवून दाखविले .या कामी शैला निकम आणि सुनेत्रा ढवळे यांनी सर्वतोपरी सहाय्य केले.
आतापर्यंत गार्डन्स क्लब कडून ग्रीन शॉपी , टेरीरियर प्राइमरी स्कूल,कोल्हापूर पब्लिक स्कूल,सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी,भगीरथी महिला संस्था ,सॅटरडे क्लब उद्योगिनी संस्था,छत्रपती शाहू हायस्कूल,न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल आणि सृजन आनंद याठिकाणी कार्यशाळा घेतल्या व ७०० च्यावर विद्यार्थी,शिक्षक वर्ग,महिला ,पुरुष या सर्वांनी लाभ घेतला . उद्योगिनी संस्थेमधे नैसर्गिक निर्मिती कार्यशाळे बरोबर गार्डन्स क्लब सदस्य श्री कृपेश हिरेमठ सर यांचे पेपर फ्लॉवर चे प्रात्यक्षिक पण देण्यात आले.गार्डन्स क्लब सदस्यांनी ५० किलोच्यावर नैसर्गिक रंग बनवून विक्रीसाठी ठेवले आहेत . त्यालाही अनेक संस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे .रंग बनविणे व सर्व कार्यशाळेसाठी डॉ.रचना संपत्तकुमार ,संगीता कोकीतकर ,रोहिणी पाटील,रेणुका वाधवानी,डॉ.स्मिता देशमुख,सिद्धी गणबोटे,कीर्ती कोराणे,मयूरा पाटील,चारुता शिंदे,अल्पना चौगुले या गार्डन्स क्लब सदस्यांनी मोलाची मदत केली . अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी ,उपाध्यक्ष श्री अविनाश शिरगावकर व सचिव सुप्रिया भस्मे व रोटरी क्लब ऑफ गार्गीस च्या अध्यक्षा कल्पना घाटगे,शोभा तावडे, ममता झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत या सर्व कार्यशाळा घेण्यात आल्या . रंगपंचमीचा सण पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक रंग वापरून साजरा करावा असे आवाहन गार्डन्स क्लब कडून करण्यात आले आहे .
गार्डन्स क्लब,कोल्हापूर तर्फे शाळांमध्ये विविध संस्थांमध्ये रंगांसाठी प्रबोधन
|