बातम्या

भाजप आणि धनंजय महाडिक यांच्या युवाशक्ती दहीहंडीला ३ लाख रुपये बक्षिस; तयारी अंतिम टप्प्यात

BJP and Dhananjay Mahadiks Yuva Shakti Dahihandi Rs 3 lakh prize


By nisha patil - 8/26/2024 10:11:08 PM
Share This News:



मंगळवारी होणार्‍या भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडीची तयारी पूर्ण, ३ लाख रूपयांचे बक्षिस असलेल्या युवाशक्ती दहीहंडीबद्दल उत्सुकता शिगेला.

मंगळवारी सायंकाळी चार वाजल्यापासून कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्तीच्यावतीने आयोजित दहीहंडी सोहळा रंगणार आहे. तब्बल ३ लाख रूपयांचे बक्षिस असलेल्या युवाशक्ती दहीहंडीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आज खासदार धनंजय महाडिक यांनी, दसरा चौक मैदानाला भेट देवून, दहीहंडी सोहळ्याच्या नियोजनाची पाहणी केली. साहसी खेळाचा दर्जा मिळालेल्या दहीहंडीमध्ये, सुरक्षेचे सर्व नियम पाळले जातील. तसेच या स्पर्धेतून गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिले जाईल, असे खासदार महाडिक म्हणाले. मंगळवारी होणार्‍या युवाशक्ती दहीहंडीला नागरिकांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

धनंजय महाडिक युवा शक्तीच्यावतीने दरवर्षी ऐतिहासिक दसरा चौकात दहीहंडीचे आयोजन केले जाते. ३ लाख रुपयांचे बक्षिस असणारी ही दहीहंडी, संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रातील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. यंदा मंगळवार २७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ऐतिहासिक दसरा चौकात युवा शक्तीचा दही-हंडी सोहळा रंगणार आहे. त्यासाठी दसरा चौकात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. आज सायंकाळी खासदार धनंजय महाडिक यांनी दहीहंडीच्या तयारीची पाहणी केली. मुख्य व्यासपीठाला लागून, महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दोन क्रेनद्वारे सुमारे ४५ फुटांवर दहीहंडी टांगली जाईल. तर मानवी मनोर्‍यावरील सर्वात वरच्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी, समीट ऍडव्हेंचर आणि हिल रायडर फौंडेशनतर्फे सेफ्टी बेल्ट असणार आहे. या सर्व तयारीची पाहणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. जास्तीत जास्त नागरिकांनी दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले आहे.

युवा शक्ती दहीहंडी स्पर्धेसाठी यंदा १४ गोविंदा संघांची नोंदणी झाली आहे. संपूर्ण कार्यक्रम स्थळी उत्तम प्रकाशयोजना करण्यात आली आहे. शिवाय दरवर्षीप्रमाणे यंदाही चॅनल बी वरुन, दहीहंडीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. सलामीपासून भरघोस बक्षिसे आणि मुख्य ३ लाखाचे बक्षिस असलेल्या युवा शक्ती दहीहंडीचे यंदाचे मानकरी कोण असणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. बालाजी कलेक्शन, काले चेतक आणि वरद विनायक इन्फ्रा प्रा. लिमिटेड हे यावर्षीच्या युवाशक्ती दहीहंडीचे प्रायोजक आहेत. यावेळी चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, विश्‍वराज महाडिक, उत्तम पाटील, संग्राम निकम, यशोराज पाटील, इंद्रजीत जाधव, उदय शेटके, अनिरूध्द कोल्हापुरे, राजसिंह शेळके, सागर बगाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


भाजप आणि धनंजय महाडिक यांच्या युवाशक्ती दहीहंडीला ३ लाख रुपये बक्षिस; तयारी अंतिम टप्प्यात
Total Views: 37