बातम्या

कल्याण पूर्वेतील अल्पवयीन तरुण हत्या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला अटक

BJP office bearer arrested in Kalyan East murder case


By nisha patil - 8/24/2023 4:50:06 PM
Share This News:



कल्याणमध्ये  चार दिवसांपूर्वी एका अल्पवयीन तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. समीर लोखंडे असं हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन तरुणाचं नाव होतं. समीर विरोधात देखील गुन्हे दाखल होते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, पोलिसांनी काही तरुणांना अटकही केली होती. यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश होता. 

या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्ये प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला देखील अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली होती. त्या दिवशी आकाश हा भाजपच्या एका मोर्चात सहभागी झाला होता. दरम्यान, घटनेच्या पूर्वी आकाश हा आरोपींच्या संपर्कात होता. मोबाईलच्या सीडीआरमुळे आकाश जैस्वालला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप पदाधिकाऱ्याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळखळ उडाली आहे.

कल्याण पूर्वेत जुन्या वादातून काही तरुणांनी लाकडी दांडक्यानं केलेल्या मारहाणीत समीर लोखंडे या अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाला होता. ज्या तरुणानं अन्य तरुणांसह समीरला मारहाण केली होती, तो तरुण देखील अल्पवयीनच आहे. समीरला जबर मारहाणीत गंभीर दुखापत झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही काळ समीरवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान समीरचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोन तरुणांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं होतं. 

पोलीस तपासादरम्यान या प्रकरणात आणखी काही तरुणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस आकाश जैयस्वाल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश जैसवाल हा केडीएमसीच्या भाजप माजी उपमहापौर विक्रम तरे यांचा निकटवर्तीय आहे. ज्या दिवशी समीरला मारहाण केली जात होती. तेव्हा आकाश हा भाजपच्या निषेध मोर्चात सहभागी होता. मात्र या प्रकरणातील फिर्यादीनं आकाश जैयस्वाल याचं नाव घेतल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मोबाईल सीडीआरमुळे आकाशचे नाव समोर आल्याची माहिती मिळत आहे.


कल्याण पूर्वेतील अल्पवयीन तरुण हत्या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला अटक