बातम्या
'कुळकायदा न्यायाधिकरणाच्या नजरेतून' पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
By Administrator - 4/8/2023 12:41:23 PM
Share This News:
'कुळकायदा न्यायाधिकरणाच्या नजरेतून' पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा परंतु किचकट अशा कुळकायद्याची माहिती उपजिल्हाधिकारी दिगंबर रौंधळ यांनी त्यांच्या 'कुळकायदा न्यायाधिकरणाच्या नजरेतून' या पुस्तकात सहज-सोप्या पद्धतीनं मांडली आहे. या पुस्तकामुळे राज्यातील नागरिकांना कुळकायदा समजणे सोपे होणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 'कुळकायदा न्यायाधिकरणाच्या नजरेतून' या पुस्तकाचे तसेच पुस्तकाचे लेखक श्री. दिगंबर रौंधळ यांचे कौतुक केले.
जमिनीच्या संदर्भात महत्वाचा कायदा असलेल्या कुळकायद्याची माहिती, अंमलबजावणीची पद्धत, कुळकायद्यासंदर्भातील न्यायनिवाडे आदींची समग्र आणि कायदेशीर माहिती देणारे 'कुळकायदा न्यायाधिकरणाच्या नजरेतून' हे पुस्तक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, हसन मुश्रीफ, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, दादाजी भुसे, मंगलप्रभात लोढा, संजय बनसोडे आदी मंत्री, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशनावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी कुळकायद्यासंदर्भात नागिराकांना समाजात येत असलेल्या अडचणी सांगितल्या. कुळकायदा समजायला अवघड असल्याने अशा प्रकारचे पुस्तक समाजासाठी उपयोगी ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रौंधळ यांच्या पुस्तकप्रकाशन उपक्रमाचे कौतुक केले. पुण्याच्या खेड तालुक्यातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा उपजिल्हाधिकारी होतो, प्रशासकीय अनुभवातून लोकोपयोगी पुस्तक लिहितो, हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. श्री. रौंधळ हे सध्या उपमुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्य अधिकारी पदावर कार्यरत असल्याचे त्यांनी नमुद केले. राज्यात महसुल सप्ताह सुरु असतानाच पुस्तकाचे प्रकाशन होणे औचित्यपूर्ण असल्याची प्रतिक्रिया महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
राज्याच्या उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी दिगंबर पोपट रौंधळ यांनी याआधी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठाचे उपप्रबंधक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. न्यायाधिकरणातील अनुभवांवर त्यांनी 'कुळकायदा न्यायाधिकरणाच्या नजरेतून' हे माहितीपूर्ण पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकासाठी त्यांना न्यायाधीश विद्याधर कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पुस्तकाचे प्रकाशन मंगळवेढा येथील सप्तर्षी प्रकाशनाने केले असून, पुस्तकाला महाराष्ट्र महसुल नायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती के. यु. चांदीवाल यांची प्रस्तावना लाभली आहे. राज्याचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनीही पुस्तकाला अभिप्रायपर शुभेच्छा दिल्या आहेत.
'कुळकायदा न्यायाधिकरणाच्या नजरेतून' या पुस्तकात संबंधित कायद्यात वेळोवेळी झालेल्या सुधारणा, शासननिर्णय, शासन परिपत्रके, न्यायिक बाबींची माहिती, न्यायाधिकरणासमोरचे युक्तीवाद, न्यायनिवाडे आदी माहिती उदाहरणांसह असल्याने हे वाचनीय तसेच संदर्भ, संग्राह्यमुल्य असलेले झाले आहे. हे पुस्तक शेतकरी, पक्षकार, विधी शाखेचे विद्यार्थी, विधीज्ञ, महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपयुक्त ठरणार आहे.
'कुळकायदा न्यायाधिकरणाच्या नजरेतून' पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
|